बारामतीत विरोधकांचे आव्हान कडवे

By Admin | Updated: January 14, 2017 03:24 IST2017-01-14T03:24:43+5:302017-01-14T03:24:43+5:30

बारामती तालुक्यातील काही गावांचा नगरपालिकेत समावेश झाल्यामुळे जिल्हा परिषदेचा १ गट आणि पंचायत समितीचे २ गण कमी झाले

Challenge opponents in Baramati | बारामतीत विरोधकांचे आव्हान कडवे

बारामतीत विरोधकांचे आव्हान कडवे

महेंद्र कांबळे / बारामती
बारामती तालुक्यातील काही गावांचा नगरपालिकेत समावेश झाल्यामुळे जिल्हा परिषदेचा १ गट आणि पंचायत समितीचे २ गण कमी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी लढत होईल. जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर असतानादेखील जिल्हा परिषदेची १ आणि पंचायत समितीच्या ४ जागा विरोधकांनी जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने १० जागा जिंकून पंचायत समितीवरील सत्ता काबीज केली होती. बारामती तालुक्यातील कोणत्याही निवडणुका एकतर्फी होणार नाहीत, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीतदेखील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पुढे कडवे आव्हान उभे करण्याच्या तयारीत भाजपाची स्थानिक नेतेमंडळी आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत बारामती नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने मिळविले. परंतु, विरोधकांचे बळदेखील वाढले. चार जागा विरोधकांना मिळाल्या. चार जागांवर विरोधी उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले. आजी-माजी नगराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलीच झाडाझडती घेतली.
राज्य व केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे भाजपाने आपले पाय जिल्ह्यात रोवण्याचा प्रयत्न सुरू केला. बारामती तालुक्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता राष्ट्रवादीच्या विरोधात गेली. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, चेअरमन रंजन तावरे यांच्यासह काही संचालकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यात सहकारात अग्रगण्य असलेल्या कारखान्याची सूत्रे भाजपाकडे गेली. त्यामुळे ग्रामीण भागातील ताकद वाढविण्यासाठी दोन वर्षांपासून भाजपाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. तरीदेखील संघटनात्मक पातळीवर बलाढ्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला कडवे आव्हान देण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

Web Title: Challenge opponents in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.