माजी अध्यक्षांच्या बंडखोरीचे आव्हान
By Admin | Updated: February 13, 2017 01:30 IST2017-02-13T01:30:04+5:302017-02-13T01:30:04+5:30
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात दिग्गजांनी बंडखोरी केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांनी

माजी अध्यक्षांच्या बंडखोरीचे आव्हान
बारामती : तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात दिग्गजांनी बंडखोरी केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांनी वडगाव निंबाळकर - मोरगाव गटातून पक्षाने आयात उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोमणे यांची उमेदवारी कायम राहणार का, हे माघारीच्या दिवशी कळेल. मात्र, त्यांनी एका पत्रकाद्वारेच उघड नाराजी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर याच गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील भगत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. हा गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या गटातून माळी समाजाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. या गटातून वडगाव निंबाळकरचे माजी सरपंच सुनील ढोले यांनी याच अनुषंगाने उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब करे यांच्यासह तब्बल २७ जणांनी या गटातून उमेदवारी मागितली होती. मात्र, नीरावागजचे रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव देवकाते यांना या गटातून पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे गटातील स्थानिक इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खोमणे यांनी तर २७ इच्छुकांमधून एकही स्थानिक, सक्षम उमेदवार पक्षाला मिळाला नाही का, असा प्रश्न पक्षनेत्यांना विचारला आहे. खोमणे यांची बंडखोरी डोकेदुखी मानली जात आहे. विविध पदांवर काम केल्यामुळे त्यांना मानणारा वर्गदेखील मोठा आहे. खोमणे यांच्यासह तीन बंडखोरांचे आव्हान देवकाते यांना आहे. त्याचबरोबर भाजपाने माणिकराव काळे हे स्थानिक उमेदवार दिल्याने लढत चुरशीची होईल. यापूर्वी देवकाते भाजपाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांना उमेदवारी देताना जातीय समीकरणाचा विचार पक्षनेत्यांनी केल्याचे चित्र आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. डोर्लेवाडी - सांगवी गटातील राजकीय खेळीसाठी त्यांनी वडगाव निंबाळकर - मोरगाव गटातून संधी देण्यात आली. मात्र, मागील ३५ ते ४० वर्षांपासून शरद पवार यांचे कट्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश खोमणे यांनी या गटात आव्हान दिले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकदेखील त्यांनी गटात वाटले आहे. शरद पवार यांनी समजूत काढल्यावर ते माघार घेतील, अशी चर्चा राष्ट्रवादीमध्ये आहे. परंतु पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या खोमणे यांनी गटातील इच्छुकांना डावलून ‘आयात’ उमेदवार दिल्याने स्वाभिमान जपण्यासाठी बंडखोरी केली आहे. त्यांनी कोऱ्हाळे येथे घेतलेल्या प्रचारसभेत ग्रामस्थांनीच निवडणुकीसाठी लोकवर्गणी दिली. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला अधिक महत्त्व आले आहे.
याच गटातून सुनील भगत यांनीदेखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सुनील ढोले यांनीदेखील बंडखोरी केली आहे. या गटात भाजपा-रासपच्या चर्चेत रासपसाठी जागा सोडण्यात आली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यानंतर रासपाचे तालुकाध्यक्ष माणिक काळे यांनाच भाजपाने उमेदवारी दिली. त्यामुळे रासपामध्ये नाराजी आहे. तसेच गणातील जागेवरदेखील भाजपाने उमेदवार दिला. जागा वाटपानंतर सोडलेल्या जागांवर भाजपाने खेळी केली.
राष्ट्रवादीचे देवकाते यांच्याविरोधात बंडखोरी केल्यानंतरदेखील प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात पक्षनेते अजित पवार यांनी विशेष टिप्पणी केली नाही. याउलट काही वेळा बंडखोरी फायद्याचीदेखील असते, एखाद्या बंडखोर उमेदवारामुळे पक्षाला फायदा होणार असेल, विरोधकांना तोटा होत असेल, अशा बंडखोरांकडे दुर्लक्ष करा, असे विधान कन्हेरीत केले. याचा अर्थ काय घ्यायचा, याचा विचार पक्ष कार्यकर्ते आणि विरोधक करीत आहेत.