लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे चक्का जाम आंदोलन
By Admin | Updated: January 31, 2017 15:19 IST2017-01-31T15:19:31+5:302017-01-31T15:19:31+5:30
मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आज सकल मराठा समाज नाणेमावळ विभागाच्या वतीने कार्ला फाटा

लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे चक्का जाम आंदोलन
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 31 - मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आज सकल मराठा समाज नाणेमावळ विभागाच्या वतीने कार्ला फाटा येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ૪५ मिनिटे चक्का जाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले. शांततेच्या मार्गाने हा चक्का जाम करण्यात आला होता.
कार्ला फाटा येथे आयोजकांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला सकाळी ११ वाजता पुष्पहार अर्पण करत चक्का जाम आंदोलन सुरु करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी व्हावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. काही समाज बांधवांनी यावेळी आपली मनोगते व भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले समाजाने महाराष्ट्रात ५७ ठिकाणी शांततेच्या मार्गाने मूकमोर्चे काढत शासनापर्यत समाजाच्या मागण्या पोहचविल्या. लाखोंच्या संख्येने समाज बांधव व भगिंनी या मूकमोर्चांमध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनांची दखल जगभरात सर्वत्र घेतली गेली मात्र डोळ्यांवर पट्टी व कानावर हात ठेवलेल्या सरकारने या आंदोलनांची दखल घेतली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यात वेळकाढूपणा सुरु असल्याने समाजाला आज चक्का जाम सारखे आंदोलन करावे लागले. मात्र समाजाने ते देखिल शांततेच्या मार्गाने केले. मराठा समाजाच्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये, समाजाचा ज्वालामुखी भडकल्यास तो शांत होणार नाही याकरिता शासनाने मराठा समाजांच्या मागण्याची तात्काळ दखल घेत त्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. तब्बल ૪५ मिनिटे सकल मराठा बांधवांच्या वतीने चक्का जाम करण्यात आल्याने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या.