चाकण : चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेना (शिंदे गट) यांच्या अधिकृत उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांनी जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपद पटकावले. तब्बल १४,९०५ मते मिळवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भाग्यश्री विवेक वाडेकर यांचा ६,९६० मतांनी पराभव केला. हा विजय एकतर्फी आणि दणदणीत ठरला आहे.
नगरपरिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने १३ जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागांवर समाधान मानावे लागले. उबाठा (मशाल) गटाला १ तर अपक्षाला १ जागा मिळाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर १२ प्रभागांतील २५ जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित २२ जागांसाठी ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
३६ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानात ३३,१२५ मतदारांपैकी २४,६०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर शिवसेना (शिंदे गट)चा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला होता.
स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा सुरेशभाऊ गोरे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्यावर निर्णायक मात केली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलाल-भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. चाकण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
---
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग १-साधना दीपक गोरे, प्रकाश लक्ष्मण गोरे, जयश्री विशाल नायकवाडी
प्रभाग २- रूपाली राहुल कांडगे, रणजित सखाराम जरे
प्रभाग ३- सुवर्णा श्याम राक्षे, अनिल इंदाराम लोहकरे
प्रभाग ४-आरती प्रीतम परदेशी, प्रेम शिवाजी जगताप
प्रभाग ५-पूनम सुनील शेवकरी, नितीन गुलाब गोरे (बिनविरोध)
प्रभाग ६-स्वाती संतोष लेंडघर, हर्षद गेनभाऊ लेंडघर
प्रभाग ७- वर्षा सुयोग शेवकरी (बिनविरोध), सागर सुरेश बनकर
प्रभाग ८- तृप्ती किशोर जगनाडे, आकाश ज्ञानेश्वर जाधव
प्रभाग ९- अनिता श्रीराम घोगरे, मंगेश शिवाजी कांडगे
प्रभाग १०- विजया शिवाजी तोडकर, प्रकाश राजाराम भुजबळ (बिनविरोध)
प्रभाग ११- विजया दत्तात्रय जाधव, साहेबराव राजाराम कड
प्रभाग १२- रेश्मा तुषार मुटके, धीरज प्रकाश मुटके
‘चाकणच्या जनतेने विकासाच्या बाजूने ठाम निर्णय दिला आहे. हा विजय केवळ शिवसेनेचा नसून चाकणकरांचा आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, औद्योगिक परिसरातील नागरी सुविधा आणि पारदर्शक प्रशासन या मुद्यावर तातडीने काम सुरू करू. विरोधकांनाही विश्वासात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू.’ -मनीषा गोरे, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा
Web Summary : Manisha Gore of Shiv Sena (Shinde faction) won Chakan Nagar Parishad election. Shiv Sena secured 13 seats, while NCP got 10. Gore defeated NCP's Bhagyshree Wadekar by a significant margin, promising development focused on key civic issues. Celebrations erupted post-victory.
Web Summary : चाकण नगर परिषद चुनाव में शिवसेना (शिंदे गुट) की मनीषा गोरे विजयी हुईं। शिवसेना को 13 सीटें मिलीं, जबकि राकांपा को 10। गोरे ने राकांपा की भाग्यश्री वाडेकर को हराया और प्रमुख नागरिक मुद्दों पर विकास का वादा किया। जीत के बाद जश्न मनाया गया।