चाकणला मतदार याद्यांमध्ये गोंधळ
By Admin | Updated: January 28, 2015 23:47 IST2015-01-28T23:47:51+5:302015-01-28T23:47:51+5:30
कुठलाही अनुचित प्रकार न घडता चाकण-नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक शांततेत पार पडली. मात्र, मतदार याद्यांमधील गोंधळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित

चाकणला मतदार याद्यांमध्ये गोंधळ
चाकण : कुठलाही अनुचित प्रकार न घडता चाकण-नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक शांततेत पार पडली. मात्र, मतदार याद्यांमधील गोंधळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. मृत मतदारांची नावे कमी न केल्याने टक्केवारी कमी झाली. या पोटनिवडणुकीत ३८ हजार १०० पैकी एकूण २५ हजार १०५ म्हणजेच ६५.८९ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक अधिकारी हिंमत खराडे यांनी दिली.
या पोटनिवडणुकीत सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ ४ ते ११ टक्के मतदान झाले होते. सुट्टीचे परिपत्रक उशिरा आल्याने कामगारवगार्तूनही कमी मतदान झाले. मतदार याद्यांमध्ये नाव व फोटो चुकल्याने, मृत मतदारांची नावे न काढल्याने व मतदान केंद्रखोल्या क्रमवार नसल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे काही मतदार मतदानापासून वंचित राहिले.
दुपारी चारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. सायंकाळी ५ वाजता मतदारांची रांग लागल्याने श्री शिवाजी विद्यालयात उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
तसेच, येलवाडी गावात एका तरुणाचे आकस्मिक निधन झाल्याने मतदार न आल्याने तेथील मतदानाची टक्केवारी घटली.
(वार्ताहर)