डॉ.नारळीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:03+5:302021-02-05T05:10:03+5:30
खोडद : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ...

डॉ.नारळीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने चैतन्य
खोडद : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड झाल्याने खोडद परिसरात व जुन्नर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खोडद येथील जागतिक दर्जाची रेडिओ दुर्बीण असलेल्या जीएमआरटी प्रकल्पात डॉ. नारळीकर हे अनेकदा आले असल्याने खोडदकरांच्या मनात डॉ. नारळीकर यांच्याविषयी आत्मीयता आणि आदर आहे.
साहित्य संमेलनाच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांच्या रूपाने वैज्ञानिक साहित्यिकाला संधी मिळणार असल्याने संशोधन, लेखन व वैज्ञानिक क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रातही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. नारळीकर यांनी विज्ञानासारख्या किचकट व अवघड क्षेत्रात सोपा करून सर्वांना समजेल व आवडेल अशा रीतीने मातृभाषेत पुस्तके लिहिली आहेत. विज्ञान कथालेखक म्हणून एकाहून एक ज्ञानवर्धक आणि रंजक भाषांतील पुस्तकांचे लेखन केले असून, त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. विज्ञान संशोधनातील त्याच्या योगदानामुळे देशाचा सर्वोच्च पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी त्यांना भारत सरकारने गौरवलेले आहे. तर 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा आणि अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्काराने देखील त्यांना गौरविण्यात आले आहे.
"जागतिक कीर्तीचे नामवंत खगोलशास्त्रज्ञ, गणिततज्ञ आणि विज्ञान साहित्यातील महर्षी डॉ. नारळीकर यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही गौरवशाली आहे. साहित्य संमेलनाकडे विज्ञानप्रेमी व तरुणांचा पुढील काळात नक्कीच कल वाढेल.डॉ.नारळीकर यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे सर्व तरूण व बाल वैज्ञानिकांना प्रेरणा मिळून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होणार आहे. इतर सर्वांना या ज्येष्ठ महामेरूसोबत चर्चा करण्याची व उत्तम श्रोता बनण्याची संधी मिळणार आहे."
- डॉ. जे. के. सोळंकी
वरिष्ठ अधिकारी, एनसीआरए, पुणे
"डॉ.जयंत नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञाला हा बहुमान दिला जातोय याचा सार्थ अभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे डॉ. नारळीकरांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व आहे. कथा सर्वांनाच आवडत असतात, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या व त्यांची उत्तरे शोधणाऱ्या त्यांच्या विज्ञानकथा रंजक असून विचार करणाऱ्या वृत्तीस आणि शोधक दृष्टिकोनास पोषक ठरतात, असे मला प्रकर्षाने वाटते. महाराष्ट्र शासन साहित्य अकादमीचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांची पुस्तके ज्ञान विज्ञानाचा समन्वय घालून वाचकाला खूप दूर ,खूप सखोल आणि अंतराळातील गूढ अगम्य अभ्यास करण्यासाठी प्रेरित करतात."
- जालिंदर डोंगरे मामा
साहित्यिक, खोडद, ता. जुन्नर
"डॉ. नारळीकरांनी विज्ञान विषय हा कथेच्या माध्यमातून सोपा करून सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडला आहे. प्रत्येक विषयाचा हा इतर विषयांशी संबंध असतोच. बालभारतीच्या पुस्तकात अनेक वैज्ञानिक धडे समाविष्ट केलेले आहेत. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वैज्ञानिक असल्याने अनेक वैज्ञानिक विचार त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून सर्वसामान्यांपर्यंत सहज सोप्या भाषेत पोहोचतील. डॉ.नारळीकरांमुळे तरुण युवक मोठ्या प्रमाणात साहित्य क्षेत्राकडे वळतील. त्यामुळे अंधश्रद्धा कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल.
रतिलाल बाबेल
अध्यक्ष, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ
खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रयोगांविषयी जाणून घेताना डॉ.जयंत नारळीकर.२९ फेब्रुवारी २००८ चे संग्रहित छायाचित्र.