स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड २९ला
By Admin | Updated: March 23, 2017 04:35 IST2017-03-23T04:35:45+5:302017-03-23T04:35:45+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक २९ मार्चला होत आहे. प्रशासनाने त्यासाठी कार्यक्रम जाहीर केला असून

स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड २९ला
पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक २९ मार्चला होत आहे. प्रशासनाने त्यासाठी कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार २४ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. मुरलीधर मोहोळ व सुनील कांबळे या भाजपाच्या दोन सदस्यांमध्ये यासाठी चुरस असून, पक्षश्रेष्ठींना त्यातील एकाची निवड करताना बरीच कसरत करावी लागणार आहे.
मुरली मोहोळ हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. यापूर्वी ते दोन वेळा नगरसेवक होते. याआधीच्या सभागृहात त्यांच्या पत्नी मोनिका मोहोळ या नगरसेवक होत्या. या वेळच्या निवडणुकीत मुरली मोहोळ विजयी होऊन सभागृहात आले आहेत. त्यांनी या पदावर दावा केला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले सुनील कांबळे हेही पाचव्या वेळी सभागृहात आले आहेत. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे ते सख्खे भाऊ असले, तरी पक्षात त्यांची स्वतंत्र ओळख आहे. लोहियानगर कासेवाडी सारख्या परिसरात अनेक वर्षांपासून ते भाजपाचे काम करीत आहेत.
(प्रतिनिधी)