पंचायत समितीचे सभापती आज निश्चित होणार
By Admin | Updated: March 14, 2017 07:56 IST2017-03-14T07:56:36+5:302017-03-14T07:56:36+5:30
जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक मंगळवारी (दि. १४) सकाळी प्रत्येक पंचायत समितीच्या सभागृहामध्ये होणार आ,...

पंचायत समितीचे सभापती आज निश्चित होणार
पुणे : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक मंगळवारी (दि. १४) सकाळी प्रत्येक पंचायत समितीच्या सभागृहामध्ये होणार आहे. यामध्ये १३ पैकी ७ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँगे्रसची एक हाती सत्ता असल्याने येथे याच पक्षाचे सभापती, उपसभापती होणार हे निश्चित आहे. परंतु, जिल्हात सर्वांधिक उत्सुकतेचा विषय हवेली पंचायत समितीचा असून, येथे २६ जागांपैकी १३ जागांवर राष्ट्रवादी काँगे्रसचे, तर अन्य १३ जागांवर विरोधी भाजपा, शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत. यांपैकी एकाला बरोबर घेतल्याशिवाय हवेली पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला आपला सभापती करणे कठीणच आहे.
जिल्हा परिषदेच्या ७५ गट व १३ पंचायत समितीच्या १५० गणांसाठी नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. तर, १३ पंचायत समित्यांपैकी ७ पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसने एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवसेनेने जुन्नर, खेड आणि पुरंदर या ३ पंचायत समित्यांवर भगवा फडकावला आहे. काँगे्रसला केवळ वेल्हा पंचायत समितीवर समाधान मानावे लागले आहे.
मावळ पंचायत समितीत भाजपाने आपला गड राखला आहे. त्यामुळे आंबेगाव, शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, मुळशी येथे राष्ट्रवादी काँगे्रसचे सभापती होणार, हे निश्चित आहे. सभापती निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून संबंधित प्रांत अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणार आहेत. (प्रतिनिधी)