बीएस्सी, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना सीईटीची सक्ती
By Admin | Updated: March 21, 2016 00:50 IST2016-03-21T00:50:09+5:302016-03-21T00:50:09+5:30
राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे.

बीएस्सी, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना सीईटीची सक्ती
पुणे : राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीप्राप्त आणि बीएस्सी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे राज्याच्या तंत्रशिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे येत्या ५ मे रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या २२ मार्चपर्यंत सीईटीसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. दर वर्षी तंत्रशिक्षण विभागाकडून घेतली जाणारी सीईटी परीक्षा यंदा प्रथमच प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी, मेडिकल व फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश दिला जाईल. परंतु, अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आणि बीएस्सी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र, थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचे बंधन नाही.
डीटीईचे अधिकारी एन. बी. पाटील म्हणाले, की राज्यातील प्रथम वर्षाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक आहे. राज्यातील बीएस्सी आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणारे अनेक विद्यार्थी द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात.