इंदापूरात प्रथमच राबवली जाणार प्रमाणित कार्यपद्धती
By Admin | Updated: June 23, 2017 04:41 IST2017-06-23T04:41:01+5:302017-06-23T04:41:01+5:30
आषाढी एकादशीची यात्रेच्या अनुषंगाने येणाऱ्या संतश्रेष्ठांच्या पालख्या, दर्शनादी सोहळा शांततेत व नियोजनबध्द रीत्या पार पडावा या साठी यंदाच्या वर्षी प्रथमच इंदापूर

इंदापूरात प्रथमच राबवली जाणार प्रमाणित कार्यपद्धती
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : आषाढी एकादशीची यात्रेच्या अनुषंगाने येणाऱ्या संतश्रेष्ठांच्या पालख्या, दर्शनादी सोहळा शांततेत व नियोजनबध्द रीत्या पार पडावा या साठी यंदाच्या वर्षी प्रथमच इंदापूर तालुक्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती राबवण्यात येत आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ अंतर्गत आयआरएस (इन्सिडेंट रिसपॉन्स सिस्टीम) प्रणालीद्वारे या कार्यपद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.ती राबवण्याकरीता जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंड कमांडर सौरभ राव यांनी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची डेप्युटी इन्सिडेंड कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे.
या संदर्भात बोलताना तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, पालखी आगमन, मुक्काम वा प्रस्थान या सर्व घडामोडीत प्रत्येक ठिकाणी सर्वांचाच सहभाग असा प्रकार नेहमी होतो. त्यामुळे जी कामे जशी होणे अपेक्षित आहे. तशी ती होत नाहीत.
सारे नियोजन कोलमडते. आषाढी एकादशी यात्रा, पालखी सोहळा या सारख्या प्राचिन परंपरा असणाऱ्या उत्सवाला उत्सवाऐवजी केवळ गर्दी गोंगाटाचे स्वरूप येते. आपल्या भागात येणाऱ्या वारकऱ्यांना पाहिजे, त्या सुविधा समाधानकारक पद्धतीने मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन हा सोहळा नियोजनबद्दल व्हावा यासाठी प्रमाणित कार्यपद्धती राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ अंतर्गत आआरएस (इन्सिडेंट रिसपॉन्स सिस्टीम)
प्रणाली द्वारे या कार्यपध्दतीचे नियोजन करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
या प्रणालीद्वारे आम्ही आगमन, मुक्काम व प्रस्थान या तीन बाबी केंद्रस्थानी धरुन आषाढी एकादशीच्या यात्रेचे चार टप्पे केले आहेत, असे सांगून ते म्हणाले की, भवानीनगर, सणसर (मुक्काम), बेलवाडी, निमगाव केतकी हा पहिला टप्पा,निमगाव केतकी (मुक्काम) ते इंदापूर हा दुसरा टप्पा, इंदापूर (मुक्काम) हा तिसरा टप्पा व इंदापूर ते सराटी (मुक्काम) हा चौथा टप्पा असे हे चार टप्पे आहेत.