सीईओंना दमदाटी प्रकरणाची चौकशी
By Admin | Updated: October 29, 2016 04:36 IST2016-10-29T04:36:02+5:302016-10-29T04:36:02+5:30
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लहूराज माळी यांना गुरुवारी एका आर्किटेक्टकडून दमदाटी करण्यात आल्या प्रकरणाची सखोल

सीईओंना दमदाटी प्रकरणाची चौकशी
पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लहूराज माळी यांना गुरुवारी एका आर्किटेक्टकडून दमदाटी करण्यात आल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. बापट यांनी शुक्रवारी सकाळी एसआरए कार्यालयामध्ये जाऊन लहूराज माळी यांची भेट घेतली. झालेल्या प्रकाराची त्यांनी माळी यांच्याकडून माहिती घेतली.
हडपसर येथील एसआर प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावावे, या कारणावरून आर्किटेक्ट संदीप महाजन यांनी माळी यांना दमदाटी केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. त्यानंतर माळी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आर्किटेक्टकडून एसआरएच्या कोणत्या प्रकल्पासाठी दबाव टाकला गेला? सद्य:स्थितीत प्रलंबित प्रकरणांची काय स्थिती आहे? याची माहिती बापट यांनी या वेळी घेतली.
एसआरएच्या कामांना गती मिळाली पाहिजे; पण नियमांचे पालन करून ही सर्व कामे मार्गी लागणे अपेक्षित आहे. गुरुवारी एसआरए कार्यालयात घडलेल्या प्रकाराबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. चौकशी अधिकारी नेमून सखोल चौकशी केली जाईल. परिस्थिती बदलत आहे, त्यानुसार एसआरएच्या नियमावलीमध्ये बदल आवश्यक आहे.
- गिरीश बापट, पालकमंत्री