हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला केंद्र सरकारचे प्राधान्य
By Admin | Updated: October 28, 2015 01:34 IST2015-10-28T01:34:55+5:302015-10-28T01:34:55+5:30
विद्यमान केंद्र सरकार व जम्मू काश्मीरमधील सरकारने हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले असल्याची माहिती जम्मू काश्मीर विधानसभेचे आमदार सुरिंदर अंबरदार

हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला केंद्र सरकारचे प्राधान्य
पुणे : विद्यमान केंद्र सरकार व जम्मू काश्मीरमधील सरकारने हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले असल्याची माहिती जम्मू काश्मीर विधानसभेचे आमदार सुरिंदर अंबरदार यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या निर्वासित हिंदू पंडितांकडे वेळोवेळी सरकारचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, आता ही स्थिती बदलत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मीर हिंदू सभेचे अध्यक्ष रमेश शिवपुरी, मंदार घाटे, विकास ननावरे या वेळी उपस्थित होते.
अंबरदार म्हणाले, की भाजप आणि पीडीपी या दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद आहेत. परंतु, काही समान मुद्द्यांवर एकत्र येत विशिष्ट अजेंडा ठरविला आहे. त्यात काश्मीरमधून निघून गेलेल्या हिंदू पंडितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात आला आहे. पंडितांच्या पुनर्वसनासाठी २००८ मध्ये केंद्र सरकारने योजना सुरू केली; पण त्यामध्ये गेल्या ७ वर्षांत केवळ १९०० तरुण-तरुणींना रोजगार मिळाले आहेत.
पुढील एका वर्षात ४ हजार जणांना रोजगार व सुविधा
देण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगत काँग्रेस सरकारकडून जाणूनबुजून हे पुनर्वसन रखडविल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. तर, पाकिस्तानी खेळाडू व कलाकार यांच्याबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबाबत शिवसेना व केंद्र सरकार दोघांचीही भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)