लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे स्वातंत्र्यानंतर इतके महिने सुरू असलेले पहिलेच सार्वजनिक आंदोलन आहे, तरीही केंद्र सरकार लक्ष देत नाही. हे सरकार लोकशाहीविरोधी सरकार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी आमदार बसवराज पाटील यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या विरोधात देशातील स्वयंसेवी संस्था संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंद कार्यक्रमाला काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यासाठी काँग्रेस भवनमध्ये एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणाला सुरूवात झाली.
तत्पूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. लोकशाहीला गुंडाळून ठेवून मनमानी करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप करून पाटील म्हणाले, दिल्लीत शेतकरी ४ महिने आंदोलन करत आहेत, सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. कामगार कायदे बदलले, ते रद्द करण्याची मागणी होत आहे, त्यावरही सरकार काही करत नाही. त्यामुळेच काँग्रेसने भारत बंदला पाठिंबा म्हणून एक दिवसाचे उपोषण करत आहे.
राज्यातील सरकारला कसलाही धोका नाही, असा दावा पाटील यांनी केला. काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळते, विश्वासात घेत नाही या सर्व अफवा आहेत, सरकार अगदी व्यवस्थित सुरू आहे, असे ते म्हणाले.
शहराध्यक्ष रमेश बागवे परगावी असल्याने अनुपस्थित होते. पालिकेतील गटनेते आबा बागुल, रत्नाकर महाजन, माजी आमदार दीप्ती चवधरी, अविनाश बागवे, अॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अरविंद शिंदे, सचिन साठे, सोनाली मारणे, संगीता तिवारी, रमेश अय्यर या वेळी उपस्थित होते. काँग्रेस भवनच्या आवारात सगळे मंडप टाकून उपोषणाला बसले होते. दुपारी ४ वाजता उपोषण थांबवण्यात आले.