केंद्रनिहाय मतदार यादी मंगळवारी प्रकाशित होणार
By Admin | Updated: February 14, 2017 02:30 IST2017-02-14T02:30:11+5:302017-02-14T02:30:11+5:30
महापालिका निवडणुकीतील मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर होईल. सोमवारी दिवसभर व रात्रीही उशिरापर्यंत

केंद्रनिहाय मतदार यादी मंगळवारी प्रकाशित होणार
पुणे : महापालिका निवडणुकीतील मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर होईल. सोमवारी दिवसभर व रात्रीही उशिरापर्यंत ही यादी संकेतस्थळावर अपलोड करण्याचे प्रशासनाचे काम सुरू होते. मतदारांच्या छायाचित्रासह ही यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.
मतदार यादी कक्षाचे प्रमुख सुहास मापारी व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी स्वातंत्र्यवीर सावरकर भवन येथे ही यादी अपलोड करण्याचे काम करीत होते. एकूण २६ लाख ३८ हजार मतदार आहेत. प्रत्येक केंद्रावर ८०० मतदार याप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रभागांचे आकार व मतदार संख्याही मोठी असल्यामुळे त्या प्रभागांमधील मतदान केंद्रांची संख्याही वाढली आहे. ४१ प्रभागांमधील एकूण मतदान केंद्रांची संख्या ३ हजार ४३२ इतकी आहे. केंद्र निहाय मतदार यादी तयार करताना काही केंद्रांवर ८२५ तर काही केंद्रांवर ७५० अशी मतदार संख्या झाली आहे.
मतदारांना मंगळवारपासून ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येईल असे मापारी यांनी सांगितले. संकेतस्थळावरून ही यादी डाऊनलोड करून त्याची प्रतही काढता येणार आहे.