गोलेगावच्या सैन्यभरतीची शताब्दी

By Admin | Updated: January 26, 2015 01:22 IST2015-01-26T01:22:57+5:302015-01-26T01:22:57+5:30

शिरूर गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात असणा-या, सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या गोलेगाव या गावाची सैन्यभरतीची शताब्दी या वर्षी पूर्ण झाली

Centenary of Goregaon's military recruitment | गोलेगावच्या सैन्यभरतीची शताब्दी

गोलेगावच्या सैन्यभरतीची शताब्दी

प्रवीण गायकवाड, शिरूर
शिरूर गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात असणा-या, सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणा-या गोलेगाव या गावाची सैन्यभरतीची शताब्दी या वर्षी पूर्ण झाली. १९१५ साली या गावातील मुकुंद मनाजी कटके हे सर्वप्रथम सैन्यात भरती झाले. तेव्हापासून सैन्यभरतीचा सुरू झालेला सिलसिला आजही सुरू आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या पाल्याला सैन्यात पाठविण्यास पालक धजवत नव्हते. विशेषत: ग्रामीण भागात असे चित्र पाहावयास मिळत असे. अशात तालुक्यातील गोलेगाव हे मात्र यास अपवाद होते. १९१५ साली कटके यांच्यासह गुजाबा पडवळ, दगडू पडवळ आदीदेखील सैन्यात भरती झाले. यांची प्रेरणा घेऊन गावातील इतर घरांतील तरुणही पुढे सैन्यात भरती झाले. सैन्यभरतीचे लोण जणू गावभर पसरू लागले व गावातील प्रत्येक घरातील तरुण सैन्यभरती होऊ लागला. स्वातंत्र्योत्तर काळात हे प्रमाण वाढत गेले.
गावातील तरुण सैन्यभरती होत होते. वेळेला निवृत्तही होत होते. मात्र, भागूजी बाळाजी वाखारे, श्रीपती विनोबा भोगावडे, बापू शंकर वाखारे, किसन शंकर वाखारे, बापू मारुती भोगावडे, चिमाजी गणपत इसवे या सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धात देशासाठी दिलेली प्राणाची आहुती गोलेगांवचे देशाप्रती असलेले प्रेम अधोरेखित करून गेली. या शहिदांबरोबरच १९६२ च्या युद्धात जयराम नारायण महाजन, तर १९७१ च्या युद्धात सोपान बळवंत वाखारे हेदेखील शहीद झाले. कारगिल युद्धात (२०००) बाळासाहेब धोंडिबा गायकवाड शहीद झाले. गावातील एकूण नऊ जण शहीद झाले.
मात्र, सैन्यात भरती होण्याचा, देशासाठी प्राणपणाला लावण्याचा जुनुन मात्र कमी झाला नाही. देशसेवेसाठीच आपली मुलं जन्माला आलीत. जणू याच भावनेतून आई-वडील आपल्या पाल्याला सैन्यात भरती करीत राहिले. तालुक्यात निर्माण झालेल्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. सिंचन प्रकल्पामुळे बागायत क्षेत्र वाढले. यातून शेती व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. नदीच्या किनारी असलेल्या गोलेगावातील तरुणांनाही या संधी निर्माण झाल्या. मात्र, देशसेवेचे प्रेम (सैन्यभरती होण्याचे) तसूभरही कमी झाल्याचे आजही दिसत नाही.

Web Title: Centenary of Goregaon's military recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.