सिमेंटीकरणाने नदीकाठच्या पाणथळ जागा नष्ट - संवर्धन करायला हवे; जीवसृष्टी, पक्ष्यांसाठी येथे परिसंस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:29+5:302021-02-05T05:15:29+5:30
पर्यावणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाणथळ किंवा जलमयभूमी जपणे आवश्यक आहे. खरं तर या जागा निरूपयोगी समजल्या जातात, पण त्या पर्यावरणासाठी ...

सिमेंटीकरणाने नदीकाठच्या पाणथळ जागा नष्ट - संवर्धन करायला हवे; जीवसृष्टी, पक्ष्यांसाठी येथे परिसंस्था
पर्यावणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाणथळ किंवा जलमयभूमी जपणे आवश्यक आहे. खरं तर या जागा निरूपयोगी समजल्या जातात, पण त्या पर्यावरणासाठी खूप उपयोगी आहेत. मानवनिर्मित पाणथळ जागा जायकवाडी जलाशय, उजनी जलाशय येथे आहेत. म्हणून येथे थंडीत खूप पक्षी खाद्याच्या शोधात येतात. परिसंस्थेतील हा एक घटक आहे.
अनेक ठिकाणी या जागा बिनकामाच्या म्हणून बुजवल्या गेल्या. नदीकाठ तर हमखास बुजवतात. सिमेंटीकरण करून काठ सुंदर करण्याच्या नादात या पाणथळ जागा नष्ट होत आहेत.
===============
जीवितनदीने तयार केली अशी जागा
जीवितनदीने विठ्ठलवाडी येथे अशी जागा तयार केली आहे. तिथे अनेक पक्षी येत आहेत. तशा जागा इतर ठिकाणी व्हायला हव्यात, असे प्रिया फुलंब्रीकर यांनी सांगितले. पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे, त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून पाणथळींबद्दल जाणीव जागृतीसाठी २ फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा होतो.
==========================
पाणथळ जागाचे उपयोग :
* अन्न तयार होते व होतो साठा
* अन्न साखळी निरोगी ठेवते
* मासे व जलचर प्राण्यांचा अधिवास
* पाणपक्ष्यांचं आश्रयस्थान
*भूजलसाठा नियंत्रित होतो
* गाळ धरून ठेवण्याची क्षमता
=================
जगातील ४०% सजीव हे पाणथळ प्रदेशावर जगतात. नदी, सरोवरे यालगतचा दलदली प्रदेश हा परळ (Persicaria glabra), कमळ, हळदी-कुंकू, अझोला, पाणकणीस, पाणलवंग, हायड्रीला तसेच वाळुंज, कदंब, अर्जुन, जांभुळ, करंज अशा वनस्पती व गवतांनी भरलेला असतो. त्या वनस्पतींवर जगणारे जलचर, प्राणी, पक्षी व कीटक हे तिथे नित्यनेमाने भेट देत असतात किंवा तिथेच वस्ती करून राहत असतात. तसेच हे दलदलीचे प्रदेश फ्लेमिंगो, स्पूनबील, आयबीस, चित्रबलाक अशा काही स्थलांतरित पक्ष्यांचे उत्तम आश्रयस्थान ठरतात. प्रदूषित पाणी गाळण्याचे कार्य याच वनस्पतींमार्फत होते.
- प्रिया फुलंब्रीकर, जीवितनदीच्या संस्थापक सदस्य व ग्रीन बर्ड्स अभियानाच्या संस्थापक
---