कानगावचा यात्रोत्सव उत्साहात

By Admin | Updated: April 29, 2017 03:53 IST2017-04-29T03:53:19+5:302017-04-29T03:53:19+5:30

कानगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहाने झाली.

Celebration of the Yatra in Kanagawa | कानगावचा यात्रोत्सव उत्साहात

कानगावचा यात्रोत्सव उत्साहात

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहाने झाली.
सोमवारी (दि. २४) पहाटे देवाला अभिषेक करण्यात आला. सकाळी देवाला भीमेच्या पवित्र जलाशयात अंघोळ घातली. त्यानंतर देव देवळात आल्यावर देवाला पोशाख चढवण्यात आल्यानंतर दुपारी ४ ते ९ वाजेपर्यंत शेरणीवाटपाचा कार्यक्रम झाला. देवाचा छबिना पारंपरिक वाद्यांच्या सुरात निघाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी झाली. सायंकाळी विठाबाई नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी (दि. २५) ४ वाजता जंगी आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते. या वेळी वजनावर कुस्त्या झाल्या. धार्मिक कार्यक्रमाची जबाबदारी देवाचे गुरव पाडुरंग साळुंके, संतोष साळुंके, विश्वनाथ जाधव यांनी पार पाडली.
यात्रेत फ्लेक्सला बंदी -
या वेळी झालेल्या यात्रेसाठी गाव यात्रा कमिटीच्या वतीने फ्लेक्सवर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर कुठलाही अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा ठिकठिकाणी लावण्यात आले होते. दरम्यान, या यात्रा कालावधीत ग्रामपंचायतीकडून कुणालाही फ्लेक्स बोर्डसाठी ना-हरकत दाखला दिला गेला नाही, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली. यात्रा शांततेत पार पाडल्यामुळे आणि एकही फ्लेक्स बोर्ड न लावल्यामुळे गावाच्या नावलौकिकात भर पडली.

Web Title: Celebration of the Yatra in Kanagawa