जेजुरीतील कडेपठारात रंगला गणपूजेचा सोहळा

By Admin | Updated: July 7, 2016 03:26 IST2016-07-07T03:26:43+5:302016-07-07T03:26:43+5:30

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा देवाच्या मूळ ठिकाण असलेल्या कडेपठारच्या डोंगरात मंगळवारी (दि. ५) रात्री गणपूजेचा आनंद सोहळा रंगला. गणपूजेसाठी जेजुरीतील ग्रामस्थ, मानकरी यांच्यासह

The celebration ceremony of the Ganapuja ceremony in the pencil at Jezuri | जेजुरीतील कडेपठारात रंगला गणपूजेचा सोहळा

जेजुरीतील कडेपठारात रंगला गणपूजेचा सोहळा

जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा देवाच्या मूळ ठिकाण असलेल्या कडेपठारच्या डोंगरात मंगळवारी (दि. ५) रात्री गणपूजेचा आनंद सोहळा रंगला. गणपूजेसाठी जेजुरीतील ग्रामस्थ, मानकरी यांच्यासह पुणे, मुंबई, नाशिक आदी परिसरातून हजारो भाविक आले होते. डोंगरामध्ये रात्रभर पाऊस पडत असतानाही भाविकांचा उत्साह मोठा होता. शेकडो वाघ्या-मुरुळींनी पारंपरिक गाणी म्हणत जागरण व गोंधळ कार्यक्रम केले. घडशी बांधवांनी रात्रभर पारंपरिक पद्धतीने वादन केले.
पेटवलेल्या दीपमाळा व भाविकांच्या हातातील दिवट्या यामुळे गडाचा सारा परिसर उजळून निघाला होता. मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. सुमारे पन्नास हजारांहुन अधिक भाविक मध्यरात्रीच्या या सोहळ्यास उपस्थित होते. पौराणिक कथेप्रमाणे जयाद्री पर्वतावर मणिसूर व मल्लासुर दैत्यांनी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अजेयत्वाचा वर मिळवला होता. काही काळानंतर हे दैत्य उन्मत झाले व सर्वांना त्रास देऊ लागले, हे संकट दूर व्हावे म्हणून सर्व गणांनी आषाढ शुद्ध प्रतिपदेला कडेपठारच्या डोंगरात भगवान शंकराची पूजा केली. यानंतर देवांनी प्रसन्न होऊन मार्तंडभैरव अवतार धारण करून मणिसुर मल्लासुर दैत्याचा संहार केला म्हणून कडेपठारच्या डोंगरात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. निसर्गाने समृद्ध असलेल्या कडेपठारच्या उंच डोंगरात खंडोबाचे मूळ प्राचीन देवस्थान आहे.
प्रथेप्रमाणे रामोशी समाजाची मानाची महापूजा झाल्यानंतर रात्री बारा वाजता गणपूजेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर ढोल व सनईच्या निनादात देवाचा छबीना काढण्यात आला. शेज सजावटीचे काम मंदिरातील पुजारी नीलेश बारभाई, धनंजय बारभाई, सचिन सातभाई, जयमल्हार आगलावे यांनी केले. कडेपठार देवतालिंग ट्रस्टच्या वतीने आलेल्या भाविकांना अन्नदान व चहा वाटप करण्यात आल्याचे सचिव सदानंद बारभाई यांनी सांगितले. सकाळी सर्वांना देवाच्या लिंगावरील हा भंडारा वाटण्यात आला. देवाचं पवित्र लेणं असणारा हा भंडार भाविक वर्षभर कपाळी लावतात. (वार्ताहर)

Web Title: The celebration ceremony of the Ganapuja ceremony in the pencil at Jezuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.