क्रिकेटप्रेमींचं सेलिब्रेशन हुकलं!
By Admin | Updated: March 27, 2015 00:24 IST2015-03-27T00:24:19+5:302015-03-27T00:24:19+5:30
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमींची निराशा झाली.

क्रिकेटप्रेमींचं सेलिब्रेशन हुकलं!
पुणे : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमींची निराशा झाली.
आॅस्ट्रेलियाविरुद्धची लढत जिंकून गुरुवारी भारत अंतिम फेरी गाठेल, अशी आशा पुणेकरांना होती. अनेकांनी हा विजय सेलिब्रेट करण्याची तयारीही केली होती. मात्र, प्रत्यक्षात आॅस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्याने पुणेकर निराश झाले होते.
सकाळी साडेनऊला सामना सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवर परिणाम जाणवला. नेहमी जाणवणारी वर्दळ कमी झाली होती. फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, टिळक रस्ता, कॅम्प परिसर आदी ठिकाणी दुपारी वाहतूक लक्षणीयरीत्या घटली होती. ‘भारत-आॅस्ट्रेलिया सामना असल्यामुळे आज नेहमीच्या तुलनेत निम्मा व्यवसाय झाला,’ असे फर्ग्युसन रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, टिळक रस्ता या परिसरातील स्टॉलधारक आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘क्रिकेट फिवर’च्या फिवरमुळे मार्केट यार्डातील आवक थोडीफार कमी झाली होती. खरेदीवर मात्र लक्षणीय परिणाम झाला. अनेक स्थानिक खरेदीदारांनी आज मार्केटकडे पाठ फिरवल्यामुळे नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के विक्री कमी झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
पोलिसांनाही भारत ही लढत जिंकेल, असे वाटत होते. विश्वचषकात भारताने आपल्या पहिल्या लढतीत
पाकिस्तानला नमवल्यानंतर पुणेकरांच्या उत्साहाला उधाण आले होते. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी पुणेकर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.
या वेळीही तसे होऊ नये
म्हणून पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, भारताला विजयाने हुलकावणी दिल्यामुळे अनेकांची निराशा झाली.
अनेक नोकरदारांनी हा सामना बघण्यासाठी आॅफिसला दांडी मारली होती. मात्र, भारताच्या पराभवामुळे सुटी वाया गेल्याची भावना सुनील पाटील, गोरक्ष जोशी, विवेक काण्णव या आयटी क्षेत्रातील नोकरदारांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)