पुणे : माझ्या बालवयात घडलेल्या अपयशाच्या प्रसंगात कुटुंबीयांनी मला कायम प्रोत्साहन देत माझे अपयश एका वेगळ्या पद्धतीने साजरे केले. त्यामुळे मनातील अपयशाची भीती जाऊन यशाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी केले. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने अध्याय १८ या विशेष परिषदेत ते बोलत होते. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ, पुणे विद्यापीठ रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा दीपा गाडगीळ आदी उपस्थित होते. खेर म्हणाले, की लहानपणापासून मला अभिनय क्षेत्रात यायचे होते. मात्र मी चांगला अभिनेता कधीच नव्हतो. शाळेच्या अनेक कार्यक्रमांमधून मी अभिनयाचा छंद जोपासायचा प्रयत्न केला. पण नेहमी त्यामध्ये अपयशीच होत राहिलो. घरचे काय म्हणतील याची भीती मनात नेहमी असायची. पण घरच्यांनी माझ्या प्रयत्नांचे कौतुक करीत मला पाठबळ दिले. त्यामुळेच अपयशातून मी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून सुवर्णपदक घेऊन बाहेर पडलो. घरच्यांनी जर माझे अपयश माझे प्रयत्न म्हणून घेतले नसते तर आज कदाचित मी अभिनेता नसतो. आज आपण स्वत: पासूनच दुरावत चाललो असून लोकांशी नाही तर लोकांबद्दल बोलण्यात धन्यता मानतो. हे टाळत स्वत:चा विचार करा, तुमची मते काय आहेत ती समजून घेऊन वागण्याचा प्रयत्न करा, असेही खेर म्हणाले. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने आयोजित अध्याय १८ या परिषदेला लेखक चेतन भगत, कोल्हापूर परिमंडळाचे विशेष पोलीस महानिरीक्षकविश्वास नांगरे पाटील, क्रिकेटपटू युवराज सिंग आणि भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक जहीर खान आदी मान्यवर उपस्थित राहून आपला प्रवास उलगडणार आहेत.
आयुष्यातील अपयश साजरे करा : अनुपम खेर; रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने ‘अध्याय १८’ परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 18:17 IST
आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी केले.
आयुष्यातील अपयश साजरे करा : अनुपम खेर; रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१च्या वतीने ‘अध्याय १८’ परिषद
ठळक मुद्देमी चांगला अभिनेता कधीच नव्हतो : अनुपम खेर'आपण स्वत: पासूनच दुरावत चाललो असून लोकांशी नाही तर लोकांबद्दल बोलण्यात धन्यता मानतो'