‘बोपखेल ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्या’
By Admin | Updated: June 17, 2015 23:19 IST2015-06-17T23:19:58+5:302015-06-17T23:19:58+5:30
सीएमईतून असलेला बोपखेल-दापोडी रस्ता पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात बोपखेलवासीयांवर पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

‘बोपखेल ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्या’
पिंपरी : सीएमईतून असलेला बोपखेल-दापोडी रस्ता पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात बोपखेलवासीयांवर पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घेण्याची मागणी रेडझोन संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.
बोपखेलच्या ग्रामस्थांनी सीएमईला जागा दिल्यानंतर तेथे लष्कराचे महाविद्यालय उभे राहिले. सीएमईच्या पश्चिम व उत्तरेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जागा पडून आहे. महाविद्यालय त्या जागेत बांधले असते तर, बोपखेलचा हक्काचा वहिवाटीच्या रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला नसता, असे समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी निवेदनात म्हटले आहे.
संरक्षण खात्याकडे मोठ्या प्रमाणात बिनावापराच्या जमिनी पडून आहेत. त्या लागवडीखाली आणल्यास लष्कराला धान्याची कमतरता भासणार नाही. लष्कराच्या डेपोतील अनेक भाग बंद असून, काही भाग स्थलांतरित केले गेले आहेत. मात्र, सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या नावाखाली जमीन पडून ठेवल्या आहेत. लष्कराच्या ताब्यातील अनेक मोक्याच्या जागा सवलतीच्या दरात विकल्या असल्याचा आरोप तरस यांनी केला. पिंपळे निलख, दिघी या ठिकाणची जमीन खासगी संस्थांना दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना भूमिहीन करून इतरांना विकण्याची पद्धत अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे सुरक्षितता धोक्यात येत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
लष्कराने स्थानिकांवर अन्याय करून संघर्षाची भूमिका घेऊ नये. सर्वसामान्य नागरिक हे भारतीयच असून, सहकार्याची भावना कायम ठेवली पाहिजे. मानवतेच्या दृष्टीने बोपखेलच्या महिला, पुरुष आणि मुलांवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत. (प्रतिनिधी)