चोर म्हणून पकडला; निघाला मनोरुग्ण
By Admin | Updated: July 6, 2015 04:43 IST2015-07-06T04:43:14+5:302015-07-06T04:43:14+5:30
वेळ रात्री दहाची... निर्माण प्राईड (गुजरमळा) या इमारतीतील एका बंद फ्लॅटच्या गॅलरीत नागरिकांना एक व्यक्ती आढळून येते... चोर समजून परिसरातील नागरिक खाली येऊन गर्दी करतात

चोर म्हणून पकडला; निघाला मनोरुग्ण
शिरूर : वेळ रात्री दहाची... निर्माण प्राईड (गुजरमळा) या इमारतीतील एका बंद फ्लॅटच्या गॅलरीत नागरिकांना एक व्यक्ती आढळून येते... चोर समजून परिसरातील नागरिक खाली येऊन गर्दी करतात... पोलिसांना पाचारण करण्यात येते... एक तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर त्याला पकडण्यात यशही मिळते... मात्र, पोलिस तपासात तो चोर नव्हे, तर माजलगाव येथून घर सोडून आलेला, काहीसे मानसिक संतुलन ढळलेला तरुण असल्याचे निष्पन्न होते.
सुरान श्रीकृष्ण तिडके असे या तरुणाचे नाव.
काल (४) रात्री दहाच्या सुमारास या फ्लॅटच्या गॅलरीत एक व्यक्ती आढळून आली. तिथे त्याने गॅलरीतील सायकल, कुंड्या खाली फेकल्या. हा प्रकार शेजारील फ्लॅटधारक खिडकीतून पाहत होते. या गोंधळामुळे परिसरातील नागरिक इमारतीखाली जमा झाले. पकडा, पकडा म्हणून ओरडू लागले. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर पोलीस आले. टेरेसवर जाऊन त्यांनी त्याला वर येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याच्या हातातील काठी तो पोलिसांच्या दिशेने भिरकावून अधिकाऱ्याला बोलवा, मी वरती येतो, असे म्हणत होता.
एक तासभर हे नाट्य सुरू होते. अमित चव्हाण, नितीन गायकवाड, गणेश आगलावे, रवींद्र पाटमस, जनार्दन शेळके, पालवे व कोककर यांनी त्याचे लक्ष विचलित केले. दरम्यान, चव्हाण व गायकवाड यांनी टेरेसवरून गॅलरीत उडी घेऊन त्याला ताब्यात घेतले.
या नाट्यमय घडामोडीने इमारतीच्या टेरेसवर, तसेच खाली नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस त्याला खाली घेऊन येत असताना दोघांनी त्याला चापटी मारल्या, मात्र पोलिसांनी त्याला नागरिकांच्या तावडीतून सहीसलामत पोलीस ठाण्यात नेले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्यात तो चोर नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तिडके हा माजलगावचा असून, तो सहा वर्षांपूर्वी घर सोडून पळालेला आहे.
मुंबई, ठाणे येथे वास्तव्यानंतर तो पुण्यात होता. एका ठेकेदाराने त्याला शिरूर येथे आणले. एका मार्बलच्या दुकानात तो कामाला लागला होता. काल तो काही गुंडांचा पिच्छा सुटावा म्हणून इमारतीत घुसला. त्याने इमारतीतील सर्व फ्लॅटधारकांचे दरवाजे जोराजोराने वाजवले व मग टेरेसवरून तो नंदकर यांच्या गॅलरीत उतरला. माजलगाव पोलीस ठाण्यात तिडकेच्या मिसिंगची तक्रार दाखल असून, त्याचे वडील श्रीकृष्ण तिडके यांना फोन करून त्याची माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिडके याच्यावर ठाणे येथील नवपाडा व राबोडी पोलीस ठाण्यात संशयितरीत्या फिरताना आढळल्याचे गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत समोर आलेले आहे. ज्या इमारतीच्या गॅलरीत तिडके आढळून आला आहे. त्या इमारतीत राहणाऱ्या लक्ष्मीनारायण सारडा यांच्या घरी तीनदा चोरी झालेली असून, सहा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याच इमारतीत राहणाऱ्या प्रदीप पोटघन यांच्या घरातही १७ तोळे सोने चोरीला गेले आहे. यामुळे तिडके हा चोरच असल्याचा नागरिकांचा संशय आहे. (वार्ताहर)