कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास अटक
By Admin | Updated: August 20, 2015 02:35 IST2015-08-20T02:35:56+5:302015-08-20T02:35:56+5:30
गुंतवणुकीच्या नावाखाली महिन्याला दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील करडे येथील ५ जणांना ९ कोटी ३२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या कौशल

कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास अटक
शिरूर : गुंतवणुकीच्या नावाखाली महिन्याला दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील करडे येथील ५ जणांना ९ कोटी ३२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या कौशल इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कल्याणीनगर या कंपनीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरातमध्ये जेरबंद केले. त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कौशल विनोदकुमार ठाकर (वय ३३, रा. इंद्रायणी हौसिंग सोसायटी, चंदननगर पुणे, मूळ सुरेंद्रनगर, गुजरात) असे त्याचे नाव आहे़ त्याने आपल्या ५ साथीदारांसह कौशल इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. ही कंपनी स्थापन करून करडे (ता. शिरूर) येथे आपले बस्तान बसविले होते. सीमाशुल्क विभागाने पकडलेला माल (सोने, चांदी, तांबे, टीव्ही, एलईडी, मोबाईल, एसी आदी) विकत घेऊन त्याची विक्री केली जाते. यासाठी लागणारी रक्कम ठेवीच्या स्वरूपात स्वीकारायची व ठेवीदाराला ३० दिवसांत मुद्दलाच्या दीड पट रक्कम द्यायची. यातील मुद्दल पुन्हा ३० दिवसांसाठी गुंतवणूक म्हणून ठेवून घ्यायचे. त्याचा परतावा द्यायचा तसेच ६ महिन्यांनी मुद्दल परत करायचे, हा या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा धंदा होता. याला करडे येथील पाच जण बळी पडले.
काही महिन्यांनी परतावा परत मिळत नाही दिसल्यावर नवनाथ पंडित लंघे (रा. करडे) यांनी २७ जुलै २०१५ रोजी पोलिसांत तक्रार दिली. लंघे यांची ५५ लाख, काळूराम बगाडे यांची ७४ लाख ५० हजार, दिलीप वाघ यांची ७५ लाख, विशाल घायतडक यांची ५ कोटी ९९ लाख तर संदीप बांदल यांची १ कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीतून पुढे आले होते. याप्रकरणी कौशल ठाकर, सुरेंद्र गोविंद आगरवाल, सचिन पंड्या, शिखा आगरवाल, वैशाली ठाकर व विठाबाई ठाकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते.
या गुन्ह्याच्या तपास पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला होता. या विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश रामाघरे, पोलीस नाईक मोरेश्वर इनामदार, सचिन गायकवाड, राजेंद्र पुणेकर व गणेश महाडिक यांच्या पथकाने बलसाड (गुजरात) येथून कौशल ठाकर याला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली.
ठाकर यांच्याकडे तपास केला असता, जुलै महिन्यात बंडगार्डन रोडवरील एका ज्वेलर्सकडे सोने खरेदीसाठी ३ कोटी ७ लाख रुपये ठेवल्याचे सांगितले़ या ज्वेलर्सच्या मालकास ठाकर याच्या अटकेबाबत माहिती मिळताच त्याने ही रक्कम पोलिसांकडे जमा केली. (वार्ताहर)