सीआयडी असल्याचे भासवून वृद्धाला लुटले
By Admin | Updated: August 12, 2014 03:58 IST2014-08-12T03:58:53+5:302014-08-12T03:58:53+5:30
येथील शिवाजी चौक परिसरात सी.आय.डी. असल्याचे सांगून एका वयोवृद्धाला एक लाख रुपयास गंडावले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली

सीआयडी असल्याचे भासवून वृद्धाला लुटले
दौंड : येथील शिवाजी चौक परिसरात सी.आय.डी. असल्याचे सांगून एका वयोवृद्धाला एक लाख रुपयास गंडावले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली. याप्रकरणी तात्याराम गावडे (वय ६0, रा. मेरगळवाडी, ता. दौंड) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
घराच्या बांधकामासाठी तात्याराम गावडे आणि त्यांचा मुलगा आबा गावडे हे दोघे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. आबा गावडे यांच्या खात्यातून एक लाख पंचेचाळीस हजार रुपये काढले. त्यानंतर तात्याराम गावडे यांनी कोपरीच्या एका खिशात एक लाख रुपये तर दुसऱ्या खिशात पंचेचाळीस हजार रुपये ठेवले. त्यानंतर दोघेही भाजी मंडईकडे कामानिमित्ताने गेले. साधारण दुपारी दीडच्या सुमारास दोघेही शिवाजी चौकात आले. तेव्हा आबा पेट्रोल भरायला गेले तर तात्याराम गावडे शिवाजी चौक परिसरात थांबले होते. स्ािंधी मंगलकार्यालयाच्या दिशेने एका मोटरसायकलवर दोन युवक आले. आणि तात्याराम यांना म्हणाले, ‘‘आम्ही सी.आय.डी. आहोत, तुमच्या खिशात गांजा आहे. मागच्या चौकात पाच लोकांकडे गांजा पकडलेला आहे.’’ असे सांगून त्यांच्या खिशाची झडती घेतली. या वेळी तात्याराम यांनी कोपरीतून एक लाख रुपये काढले, तेव्हा एका युवकाने ते पैसे हातात घेतले आणि नंतर एक बंडल तात्याराम यांच्या पिशवीत टाकले आणि थोड्याच वेळात हिंद टॉकीजच्या दिशेने हे दोघेही युवक फरार झाले. तात्याराम यांनी पिशवीत बघितले तेव्हा पिशवीत पैशाचे बंडल नव्हते. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)