मुद्रांक कार्यालयाचा कारभार कॅशलेस
By Admin | Updated: November 16, 2016 03:33 IST2016-11-16T03:33:42+5:302016-11-16T03:33:42+5:30
मुद्रांक शुल्क भरणा आॅनलाईन केल्यानंतर आता नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्त नोंदणी करताना आकारले जाणारे हाताळणी शुल्कही

मुद्रांक कार्यालयाचा कारभार कॅशलेस
पुणे : मुद्रांक शुल्क भरणा आॅनलाईन केल्यानंतर आता नोंदणी व मुद्रांक विभागाने दस्त नोंदणी करताना आकारले जाणारे हाताळणी शुल्कही आॅनलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास दुय्यम निबंधक कार्यालयामधील सर्व कारभार कॅशलेस होईल.
नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी अधिकाधिक आॅनलाईन सुविधा देण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून नोंदणी विभागाने आता दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आॅनलाईन माध्यमातून भरण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. नुकतेच केंद्र सरकारने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणी कार्यालयात रोख स्वरूपात द्यावे लागणारे हाताळणी शुल्क भरण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यावर नोंदणी विभागाने दस्त हाताळणी शुल्क डीडीद्वारे स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. दस्त नोंदणी कार्यालयात मुद्रांक शुल्क आॅनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाते. यासाठी नोंदणी विभागाने ग्रास ही प्रणाली सुरू केली आहे. या कॅशलेस प्रस्तावास मान्यता मिळावी, यासाठी नोंदणी विभाग पाठपुरावा करत आहे.