कुंडी प्रकरणात शिक्षणप्रमुख ‘नापास’
By Admin | Updated: May 21, 2014 01:19 IST2014-05-21T01:19:59+5:302014-05-21T01:19:59+5:30
आचारसंहिता सुरू असतानाही महापालिका शाळांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अवाजवी दराने केलेली कुंड्यांची खरेदी शिक्षणप्रमुख तुकाराम सुपे यांना भोवली आहे.

कुंडी प्रकरणात शिक्षणप्रमुख ‘नापास’
पुणे : आचारसंहिता सुरू असतानाही महापालिका शाळांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली अवाजवी दराने केलेली कुंड्यांची खरेदी शिक्षणप्रमुख तुकाराम सुपे यांना भोवली आहे. या प्रकरणी झालेल्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांना शिक्षण मंडळातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी होण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त विकास देशमुख यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांच्या मागणीनुसार, चौकशी अहवाल आज मुख्य सभा तसेच स्थायी समितीत सादर करण्यात आला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच तुपे यांची राज्यशासनाकडून महापालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षणप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना, शिक्षण मंडळ अध्यक्षांच्या संमतीने सुपे यांनी महापालिका शाळांच्या सुशोभीकरणासाठी प्रत्येक शाळेस हजार रुपयांना एक याप्रमाणे प्रत्येकी तीन कुंड्या खरेदी केल्या होत्या. तसेच याची रक्कम मुख्याध्यापकांच्या माध्यमातून संबंधित ठेकेदारांना देण्यात आली होती. हा प्रकार विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे आणि मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी मुख्य सभेत उजेडात आणल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी चौकशीची मागणी केली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुपे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केलेल्या चौकशीत सुपेंवर ठपका ठेवण्यात आल्याने त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस शिक्षण उपसंचालकांकडे करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)