फर्गसनमध्ये साजरा झाला आनंदोत्सव
By Admin | Updated: July 7, 2015 03:47 IST2015-07-07T03:47:28+5:302015-07-07T03:47:28+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) हेरीटेज दर्जा प्राप्त झालेल्यामुळे फर्गसन महाविद्यालयाला ५ कोटी निधी प्राप्त होणार असून सध्या महाविद्यालयास २० लाख रुपये प्राप्त झाले आहेत

फर्गसनमध्ये साजरा झाला आनंदोत्सव
पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) हेरीटेज दर्जा प्राप्त झालेल्यामुळे फर्गसन महाविद्यालयाला ५ कोटी निधी प्राप्त होणार असून सध्या महाविद्यालयास २० लाख रुपये प्राप्त झाले आहेत.या निधीतून टप्प्या टप्प्याने महाविद्यालयाच्या मुख्य इमारती, अॅम्फी थिएटर, मुला-मुलींचे वसतीगृह अशा इमारतीच्या डागडूजी केले जाणार आहे. सर्वप्रथम जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र संग्रहालयांचे अत्याधुनिकरण करण्यात येणार असल्याची माहिती डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विकास काकतकर यांनी दिली.
पुणे शहरातील वैभवात भर घालणा-या फर्गसन महाविद्यालयास युजीसीकडून हेरीटेज दर्जा देण्यात आला. त्यामुळे सोमवारी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आनंदोत्स्व साजरा केला. या वेळी काकतकर यांनी फर्ग्युसन महाविद्यलायाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.याप्रसंगी प्रभारी प्राचार्य दीपक चौघुले, कार्यवाह आनंद भिडे, नियामक मंडळाचे सदस्य शरद कुंटे आदी उपस्थित होते.
काकतकर म्हणाले, ‘‘सर्व सामान्य नागरिकांनी फर्गसन महाविद्यालयाला हेरीटेज दर्जा केव्हाच दिला होता. युजीसीने त्यावर केवळ शिक्का मोर्तब केले आहे. फर्गसन महाविद्यलयास ६६ एकर परिसर लाभला असून महाविद्यालयाने १३० वर्षांचा टप्पा पार केला आहे. १८९२ साली महाविद्यालयाची कोणशीला बसविण्यात आली. महाविद्यालयाने जपलेला ऐतिहासिक वारसा आणि गुणवत्तेवर दिलेला भर विचारात घेवून युजीसीने महाविद्यलायास हेरीटेजचा दर्जा दिला आहे. त्यात अॅम्फी थेअटर, बॉटॉनिकल गार्डन, २७ विभाग, मुला-मुलींचे वसतीगृह, स्वातंत्रवीर सावकर यांची खोली आदींचा समावेश आहे. महाविद्यालयात ७,८०० विद्यार्थी शिक्षण घेत असून महाविद्यलायाने परदेशातील विविध विद्यापीठांशी करार केले आहेत.(प्रतिनिधी)