नातेवाईकाला सांभाळणे पडले चांगलेच महागात; टोळीप्रमुखासह साथीदारावर मोक्का कारवाई
By नम्रता फडणीस | Published: November 22, 2023 03:43 PM2023-11-22T15:43:50+5:302023-11-22T15:44:53+5:30
दोघेही फरार असून, त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : टोळीप्रमुखाच्या मुलाला सांभाळणे नातेवाईकाला चांगलेच महागात पडले. नातेवाईकाकडे वारंवार पैशाची मागणी करुन धमकी देणा-या मोहसिन उर्फ मोबा बडेसाब शेख या टोळीप्रमुखासह त्याचा साथीदार मोईन काळू शेख यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोघेही फरार असून, त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व टोळीप्रमुख मोहसिन उर्फ मोबा बडेसाब शेख हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मोहसिन उर्फ मोबा बडेसाब शेख यांचा मुलगा आजारी असल्याने आणि तो जास्त त्रास देत असल्याने रागाच्या भरात त्याला मारुन टाकतो असे म्हटल्याने नातेवाईकाने त्याची समजूत काढली आणि तुझ्या मुलाला मी सांभाळतो असे म्हणत नातेवाईक त्याच्या मुलाला पालनपोषणाकरिता घरी घेऊन गेला. टोळीप्रमुख अधूनमधून घरी जाऊन मुलाला त्रास देत होता. नातेवाईकाने असे का करतो विचारल्यानंतर "तू मला 1 लाख रुपये दे नाहीतर मुलाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी त्याने दिली. त्यांच्यासह मुलाला मारुन टाकेल या भीतीने त्यांनी काही रोख रक्कम टोळीप्रमुखाला दिली. त्यानंतर तो वारंवार फिर्यादीकडे पैशाची मागणी करीत होता.
टोळीप्रमुखाच्या साथीदाराने देखील फिर्यादींना शिवीगाळ करुन आम्हाला खर्चाला पैसे दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन दोघांनी फिर्यादीला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी संघटितपणे दह्शतीच्या मार्गाने बेकायदेशीरपणे स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हा केल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्या वर्तवणुकीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर भा.द वि कलम 386, 387,504, 507, 34 याप्रमाणे दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.