कॅन्टोन्मेंटची निवडणूक जानेवारीत

By Admin | Updated: November 7, 2014 00:13 IST2014-11-07T00:13:51+5:302014-11-07T00:13:51+5:30

देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डापैकी ५५ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या सर्व विद्यमान बोर्ड सदस्यांचा पाच जुन २०१४ पर्यंत कार्यकाल वाढविण्यात आला असल्याचे नमूद केले होते

Cantonment election in January | कॅन्टोन्मेंटची निवडणूक जानेवारीत

कॅन्टोन्मेंटची निवडणूक जानेवारीत

किवळे : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या आधिपत्याखालील दिल्ली येथील रक्षा संपदा महासंचानालयाने देशभरातील एकूण ६२ बोर्डांपैकी देहूरोड, खडकी व पुणे कॅन्टोन्मेंटसह एकूण ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक येत्या ११ जानेवारीला घेण्याचे निर्देश सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंना बुधवारी पाठविलेल्या पत्राद्वारे दिले असून लवकरच बोर्डाच्या विशेष बैठकीत पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती देहूरोड बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र महाजनी यांनी दिली.
देशातील ६२ पैकी ५५ कॅन्टोन्मेंट बोर्डांतील लोकप्रतिनिधींची दोनदा वाढवलेली सहा महिन्यांची मुदत पाच जूनला संपल्याने देहूरोड , खडकी व पुणेसह ५५ कॅन्टोन्मेंट बोर्ड एक वर्षासाठी बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेतला होता. मात्र त्यांनतर पाच महिन्यात संरक्षण मंत्रालयाकडून कॅन्टोन्मेंट कायद्यान्वये बोर्डात नागरी सदस्य नेमण्याबाबत अगर बोर्डाच्या निवडणुका घेण्याबाबत निर्णय होत नसल्याने बोर्डाच्या हद्दीतील विविध विकासकामे ठप्प झाली असल्याबाबत ‘लोकमत’ने २७ आॅक्टोबरच्या अंकात ‘निवडणूकीला मुहूर्त कधी?’ या शीर्षकाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर बुधवारी संरक्षण विभागाने निवडणूक घेणेबाबत संबंधितांना सुचित करून ११ जानेवारी २०१५ ला निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.
देशातील बरखास्त झालेल्या ५५ कॅन्टोन्मेंट बोर्डांत राज्यातील देहूरोड (पुणे), खडकी (पुणे), पुणे, कामाठी (नागपूर), देवळाली (नाशिक), अहमदनगर, व औरंगाबाद या सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा समावेश आहे. या सर्व बोर्डांची सार्वत्रिक निवडणूक सहा वर्षापूर्वी १८ मे २००८ ला झाली होती. संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्या खालील देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका मे २०१३ मध्ये होणे अपेक्षति असताना २०११च्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करीत दिल्लीतील कॅन्टोन्मेंट विभागाच्या प्रमुखांनी तीन एप्रिल २०१३ला ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी ५५ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विद्यमान सदस्यांना ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत पहिली मुदतवाढ दिलेली होती. मात्र ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत निवडणूक न झाल्याने कॅन्टोन्मेंट कायदा २००६ च्या कलम १४ (१) तील तरतुदीनुसार विद्यमान सदस्यांना आणखी पाच महिने पाच दिवस मुदतवाढ देणारे पत्र ३० डिसेंबर २०१३ ला पाठविले होते.
या पत्रानुसार देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डापैकी ५५ कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या सर्व विद्यमान बोर्ड सदस्यांचा पाच जुन २०१४ पर्यंत कार्यकाल वाढविण्यात आला असल्याचे नमूद केले होते. मात्र पाच जून २०१४ पर्यंत बोर्डाच्या निवडणुका न झाल्याने देशातील ५५ कॅन्टोन्मेंट बोर्ड एक वर्षासाठी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (वार्ताहर)

Web Title: Cantonment election in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.