छाननीमध्येच उमेदवारांची परीक्षा
By Admin | Updated: February 5, 2017 03:51 IST2017-02-05T03:51:13+5:302017-02-05T03:51:13+5:30
महापालिका निवडणुकीतील ४१ प्रभागांमधील १६२ जागांसाठी १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दाखल झालेल्या २ हजार ६६२ उमेदवारी अर्जाची छाननी त्या त्या क्षेत्रीय कार्यालयात

छाननीमध्येच उमेदवारांची परीक्षा
पुणे : महापालिका निवडणुकीतील ४१ प्रभागांमधील १६२ जागांसाठी १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दाखल झालेल्या २ हजार ६६२ उमेदवारी अर्जाची छाननी त्या त्या क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली. त्यात एकूण ३०९ उमेदवारी अर्ज बाद झाले. सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत छाननीचे काम सुरू होते. हरकत घेण्यात आलेल्या काही दिग्गज उमेदवारांच्या अर्जावर घेण्यात आलेल्या हरकतींवरचे निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राखीव ठेवले होते.
प्रभाग क्रमांक २५ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. काँग्रेसच्या वतीने तिथे अभिजित शिवरकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापौर प्रशांत जगताप अशी लक्षणीय लढत होती. हरकतींच्या वेळी महापौर जगताप यांनी शिवरकर यांच्या अर्जावर एका ठिकाणी स्वाक्षरी नसल्याची हरकत घेतली. त्याच्या सुनावणीत शिवरकर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांनी बाद केला. काँग्रेसच्या रजनी पाचंगे (प्रभाग क्रमांक १५) यांचाही अर्ज बाद झाला असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेने काही अपक्षांना ऐनवेळी उमेदवारी दिली होती. मात्र, एबी फॉर्म नसल्याने अर्ज बाद करण्यात आले.
सकाळी ११ वाजता सुरू झालेली छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. औंध क्षेत्रीय कार्यालयात २५ , येरवडा ३२, नगररोड ५१ कोथरुड २२, कोंढवा-वानवडी ६, घोले रोड २२, वारजे-कर्वनगर-५७, कसबा विश्रामबागवाडा ३३, टिळक रोड कार्यालयात २५ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांवर पक्षपाताचा आरोप
कॉँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पक्षपाती असल्याचा आरोप अर्ज बाद ठरविल्यावर केला. कॉंग्रेसने अगोदर उमेदवारी दिलेले अस्लम बागवान अर्ज माघार घेण्यास तयार होते. मात्र, आमचं म्हणणे ऐकून घेतले नाही. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयात रात्री उशिरा सुनावणी ऐकण्यासाठी आलेले समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना कार्यालयात जाण्यापासून रोखण्यात आले. भाजपाच्या प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवार कल्पना बहिरट यांच्या जात प्रमाणपत्रावर हरकत घेण्यात आली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच माजी अध्यक्ष अभय छाजेड यांना कार्यालयात येऊ दिले नव्हते. रात्री उशिरा मंत्री कांबळे तिथे आले व थेट कार्यालयात जाऊ लागले. त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. त्याकडे दुर्लक्ष करून कांबळे वर जाऊ लागले. त्यामुळे तणाव निर्माण झाला.