घरचे जेवण मिळण्याचा एकबोटेंचा अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:36 IST2018-03-27T04:36:42+5:302018-03-27T04:36:42+5:30
कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी घरचे

घरचे जेवण मिळण्याचा एकबोटेंचा अर्ज फेटाळला
पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी घरचे जेवण मिळण्याबाबत न्यायालयात दाखल केलेला अर्ज विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी फेटाळून लावला.
एकबोटे यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची १४ दिवसांसाठी न्यायायलीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यावेळी न्यायालयाने कारागृह प्रशासनाला योग्य तो औषोधोपचार देण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, एकबोटे यांच्या वतीने सुरक्षा आणि घरगुती जेवण मिळण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.
कारागृह अधिकारी, फिर्यादी आणि तपास अधिकारी यांनी या अजार्ला विरोध केला. कारागृह प्रशासनाकडून बंदीवानांना चांगला आहार दिला जात असल्याचे सांगताना एकबोटेंचा घरचे जेवण देण्यासंदर्भातील अर्ज मान्य केल्यास इतर कैद्यांमध्ये योग्य संदेश जाणार नाही,असे म्हणणे कारागृह अधिकाऱ्यांनी मांडले. एकबोटेंना यापूर्वीच योग्य ती सुरक्षा पुरविण्यात आली असल्याचे सांगत एकबोटेंचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.