पुरंदर विमानतळाची नवीन जागा रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:31+5:302021-02-05T05:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुलेश्वर ; पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर येथे होणाऱ्या नियोजीत विमानतळाला जमीन ...

पुरंदर विमानतळाची नवीन जागा रद्द करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भुलेश्वर ; पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर येथे होणाऱ्या नियोजीत विमानतळाला जमीन देण्यास येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. यामुळे विमानतळास सुचवलेली नवीन जागा रद्द करण्याची मागणी या परिसरातील विमानतळ विरोधी संघर्ष समीतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
पुरंदर तालुक्यात दोन हजार चारशे हेक्टर जागेवर छञपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. या साठी दोन जागा निश्चित केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पुरंदरच्या पूर्व भागातील पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या गावांतील जागा नियोजित विमानतळास निश्चित करण्यात आली. मात्र, येथील शेतकऱ्यांनी विमानतळविरोधी संघर्ष समिती स्थापन करुन तीव्र आंदोलन करत विमानतळास जमिनी देण्यास स्पष्ट विरोध केला. येथील शेतकरी आक्रमक झाल्याने पुरंदरच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव परिसरातील नवीन जागेचा पुरंदर विमानतळासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. ही जागा विमानतळास योग्य असल्याचे देखील सांगण्यात आले. यामुळे तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या बागायती जमिनी जाणार म्हणून या परिसरातील शेतकरी आक्रमक बनला आहे. विमानतळबाधित गावागावांत विरोध करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. पुरंदरच्या पूर्व भागात जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पांडेश्वर भागात सातशे एकरपर्यंत ऊस बागायती असून, एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के शेती ऊस बागायती आहे. डाळिंब, सीताफळ, पेरू या बागाही मोठ्या प्रमाणात उदयास आलेल्या आहेत. येथील नवयुवक आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. दोन्ही योजनांचे बिल कधीही न थकाविता येथील शेतकरी वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात. यामुळे आम्ही शेती करतो विमानतळ नको, असा नारा येथील शेतकऱ्यांनी लावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते काल सासवड येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बाधित गावांतील ग्रामस्थांनी व विमानतळविरोधी संघर्ष समितीने येथील जागा रद्द करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली. या वेळी विमानतळ संघर्ष समितीतील सदस्य माणिकराव झेंडे पाटील, संतोष कोलते, महेश कड, शैलेश रोमन, किरण साळुंखे, किशोर खळदकर, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने या भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ : विमानतळ संघर्ष समिती खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देताना.