विसर्जन घाटांवर कॅमेऱ्यांची राहणार नजर
By Admin | Updated: August 25, 2014 05:18 IST2014-08-25T05:18:10+5:302014-08-25T05:18:10+5:30
गणेशोत्सवादरम्यान, विसर्जन घाटांवर सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून सर्व प्रमुख १६ घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत

विसर्जन घाटांवर कॅमेऱ्यांची राहणार नजर
पुणे : गणेशोत्सवादरम्यान, विसर्जन घाटांवर सुरक्षिततेसाठी महापालिकेकडून सर्व प्रमुख १६ घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, हे कॅमेरे बसविण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पोलीस यंत्रणेच्या मागणीनुसार, तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव हे कॅमेरे बसविण्यात येत असल्याचेही प्रशासनाकडून स्प्ष्ट करण्यात आले आहे.
मात्र, दुर्घटना टाळण्यासाठी हे कॅमेरे बसविण्यात येत असले तरी, ते अॅनलॉग पद्धतीचे असल्याने त्याद्वारे अस्पष्ट तसेच तकलादू चित्रीकरण होत असल्याने हे कॅमेरे कितपत उपयोगी ठरणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रत्येक घाटावर चार कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याचे नियंत्रण, त्याद्वारे करण्यात येणाऱ्या चित्रीकरणाचे रेकॉर्डिंग तसेच मॉनिटरिंगसाठी प्रत्येकी २४ हजार रुपयांचा खर्च महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचे तांत्रिक विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)