लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील पेठांमध्ये छापे टाकून घरे, दुकाने आणि इतर व्यावसायिक संकुलांमध्ये बसवण्यात आलेले बेकायदेशीर मोबाईल सिग्नल रिपीटर्स काढून टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये २२ बुस्टर ताब्यात घेण्यात आले तर फीडर जॉंइट्स कापून पंधरा बुस्टर निकामी करण्यात आले.
फरासखाना पोलिस ठाण्याच्या न्यायकक्षेत ७ नोटिसाही काढण्यात आल्या आहेत. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (डॉट) आणि वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनचे (डब्ल्यूएमओ) अधिकारी अमित गौतम यांच्या नेतृत्वात गजेंद्र मेवारा, कैलाशनाथ व आर. एन. लहाडके यांनी तसेच स्थानिक प्रशासन आणि मोबाइल ऑपरेटर्सच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईबद्दल ‘डॉट’चे अमित गौतम म्हणाले, “बेकायदेशीर बूस्टर्सच्या विरोधात आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत. गेल्या वर्षी सुमारे पाचशे बूस्टर्स आम्ही काढून टाकले. कॉल ड्रॉप्ससाठी कारणीभूत ठरणाऱ्या आणि मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी कमी करणाऱ्या बेकायदेशीर बुस्टर्सच्या विरोधात आमची कारवाई चालूच राहिल. यंदा आतापर्यंत ३१९ रिपीटर्स, २७९ निष्क्रिय रिपीटर्स काढून घेतले आणि १०७ नोटिसा दिल्या. लोकांनी बेकायदेशीर रिपीटर्स वापरू नयेत, कारण त्यांच्यामुळे मोबाइल नेटवर्क्समध्ये खूप मोठा अडथळा येतो.”
चौकट
मोठ्या दंडाची तरतूद
-डॉटच्या वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशननुसार भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा, १०३३ आणि भारतीय टेलिग्राफ कायदा, १८८५ नुसार बेकादेशीर रिपीटर्स बाळगणे किंवा विकणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. अशा प्रकारचे बेकायदेशीर रिपीटर्स बसविणाऱ्या अनेक इमारतींच्या मालकांना मोठा दंड आकारला जाऊ शकतो.
चौकट
मोबाईलमध्ये या समस्या
-बेकायदेशीर मोबाइल सिग्नल रिपीटर्स ही मोठ्या त्रासाची बाब बनली आहे. कॉल ड्रॉप्स, डेटा स्पीड कमी होणे आणि नेटवर्कमधील अडथळ्यांमागचे हे सर्वात मोठे कारण आहे. चांगला मोबाइल सिग्नल मिळवण्यासाठी व्यक्ती, व्यावसायिक संकुले, कार्यालये आदी ठिकाणी बेकायदेशीर रिपीटर्स बसविले जातात. अशा जोडण्या शोधण्यासाठी व त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी डॉटने मोहीम हाती घेतली आहे.