पिंपळगाव योजनेचा हिशोब द्या
By Admin | Updated: May 11, 2017 04:11 IST2017-05-11T04:11:57+5:302017-05-11T04:11:57+5:30
पिंपळगाव (ता. दौंड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेत राजकारण करणाऱ्यांनी आधी तीन कोटींचा हिशेब द्यावा आणि मग राजकारण करावे

पिंपळगाव योजनेचा हिशोब द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
राहू : पिंपळगाव (ता. दौंड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेत राजकारण करणाऱ्यांनी आधी तीन कोटींचा हिशेब द्यावा आणि मग राजकारण करावे, असे मत विद्यमान सरपंच रमेश कापरे यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव (ता. दौंड) येथील १ मे रोजी गणसंख्येअभावी तहकूब झालेली ग्रामसभा शुक्रवारी (दि. ५) विठ्ठल मंदिरात बोलावण्यात आली होती. या वेळी पाणीपुरवठा योजनेसह, वृक्षलागवड, निवडणुकात महिलांचा सहभाग, वार्षिक जमाखर्चाला मंजुरी देणे सन २०१७ ते २०१८ आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, रोजगार हमी, जिल्हा परिषदेच्या विविध योजना, स्वच्छ भारत मिशन चौदाव्या वित्त आयोग विकास आराखड्याला मान्यता देणे या व अशा अनेक विषयांवर साधकबाधक चर्चा झाली. परंतु, माटोबा तलावातून तीन कोटी २५ लाखांच्या जवळपास खर्च करून झालेल्या पाणीपुरवठा योजनेवरून सभा वादळी ठरली.
पाणीपुरवठा योजना सुरळीत चालत नसून व गावात कमी दाबाने पाणी येत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सभास्थानी ग्रामस्थांतून बोलले जात होते. पिण्याच्या पाण्यासाठी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे शेवटी सांगितले. यावर उत्तर देताना पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगांबर कापरे यांनी पाणीपुरवठा योजना सुरळीत चालली असून, त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा सभेत दिला.
यावर सरपंच रमेश कापरे म्हणाले, की योजना सुरळीत चालू आहे आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही, असे पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष म्हणत असतील, तर मग सव्वातीन कोटींचा हिशेब देऊन व योजना पूर्ण क्षमतेने चालून आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यास पाणीपुरवठा समितीने विलंब का केला? असा सवाल केला.
पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष डिगांबर कापरे म्हणाले, की गेली १७ महिन्यांपासून ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहे व इस्टिमेटप्रमाणे सर्व कामे पूर्ण झाली आहेत. विरोधक राजकारण करीत आहेत. त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे.