चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून पत्नीची केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:19 IST2017-07-27T20:19:03+5:302017-07-27T20:19:10+5:30
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रजमध्ये घडली.

चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून पत्नीची केली हत्या
पुणे, दि. 27 - चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रजमध्ये घडली. दोन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाल्याने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. पती फरार असून, त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ॠतुजा दीपक जाधव ( वय 18 रा. शारदा भवन संतोषनगर कात्रज) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. दीपक जाधव असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. माया गोळे ( वय 38 रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आणि ऋतुजा यांचा २३ मे २०१७ ला विवाह झाला होता. विवाहानंतर १५ दिवसानंतर दीपकने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. तो छोट्या छोट्या कारणावरून तिला मारहाण करत होता. हे ऋतुजाच्या कुटुंबियांना कळल्यानंतर त्यांनी दीपकला समजावले देखील होते. मात्र तरी देखील त्याचा पत्नीवरील अत्याचार सुरुच होता. नागपंचमीच्या सणाला घरी घेऊन जाण्यासाठी बुधवारी ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींनी दीपकला फोन केला. पण त्याने फोनच उचलला नाही. त्यानंतर ही मंडळी थेट मुलीच्या सासरी पोहोचली. पण त्यांना घराला कुलूप दिसले. यावेळी दीपक हा हडपसरमध्ये मद्यपान करत बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचा शोध घेऊन त्यांनी त्याच्याकडे ऋतुजा कोठे आहे? याची विचारपूस केली. यावेळी नशेत असलेल्या दीपकने पत्नीला मारल्याचे सांगितले. दीपकच्या या उत्तराने ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींना धक्काच बसला. घाबरलेल्या अवस्थेतून सावरत त्यांनी पुन्हा कात्रजच्या घरी धाव घेतली. त्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना आपली मुलगी मृत अवस्थेत आढळली. दीपकने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची तक्रार ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींनी दिली असून खुनी पती फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.