पुणे : मराठी, हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेत ३ दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधूर संगीताने, रसिकांच्या मनावर राज्य करणारे गायक व संगीतकार स्व. सी. रामचंद्र तथा रामचंद्र नरहर चितळकर यांच्या वापरातील पियानो आता राजा दिनकर केळकर संग्रहालयात पहायला मिळेल. रविवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता संग्रहालयामध्ये छोटेखानी समारंभामध्ये हा पियानो सुप्रसिद्ध ॲकॉर्डियन वादक इनॉक डॅनियल यांचे हस्ते स्वीकारण्यात आला.सी. रामचंद्र अण्णांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी बेन यांनी हा पियानो मुंबईस्थित सुरेश यादव यांच्या कुटुंबियांकडे त्याची जपणूक करण्यासाठी सुपूर्द केला होता.पियानोचे सुयोग्य जतन राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये होईल व पुढील पिढ्यांना तो पाहता येईल या सद्भावनेने सुरेश यादव यांनी तो संग्रहालयास सुपूर्द करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता.या छोटेखानी समारंभास सुरेश यादव हे सपत्नीक,त्यांच्या स्नेह्यांसह उपस्थित होते.संग्राहक दिनकर केळकर यांचे पुतणे ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, संगीत क्षेत्रातील जाणकार अभ्यासक डॉ. प्रकाश कामत, मेलडी मेकर्सचे सुहासचंद्र कुलकर्णी, मंगेश वाघमारे, श्याम मोटे, नितीन मेणवलीकर, संग्रहालयाचा कर्मचारी वर्ग विशेषकरून उपस्थित होते. राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी स्वागत केले. सुरेश यादव, इनॉक डॅनियल यांनी सी. रामचंद्र यांच्या आठवणी सांगीतल्या, दोघांनीही पियानोवर ' भोली सुरत दिल के खोटे' च्या सुरावटी वाजवून उपस्थितांना संगीताच्या सुवर्णकाळात नेले.सी.रामचंद्र तथा अण्णांनी अनेक गाणी याच पियानोवर बसून संगीतबद्ध केली होती.१९७५ मध्ये अण्णांनी सुरू केलेल्या 'मुलाये न बने' या वाद्यवृंदात श्री.यादव यांनी सॅक्सोफोन वाजविण्यास सुरुवात केली होती. यादव यांची दोन्ही मुले सुशांत आणि संदेश हेही याच पियानोवर शिकले. संगीत सहाय्यक रचनाकार इनॉक डॅनियल यांनी सी.रामचंद्र यांचेसह इतर विविध संगीतकारांसोबतही अप्रतिम ॲकॉर्डियन वादन केले आहे.आपल्या यशस्वी हिंदी चित्रपट कारकीर्दीत पाश्चिमात्य संगीताचा उत्तम वापर करणारे सी. रामचंद्र हे पहिले संगीतकार होत. सी. रामचंद्र यांनी आपल्या यशस्वी संगीत कारकीर्दीत ११८ हिंदी, ७ मराठी, १ तमीळ व १ तेलगू चित्रपटांना उत्तम संगीत दिले. शहनाई, आशा, अनारकली, अलबेला, आझाद अशा निवडक व लोकप्रिय चित्रपटांचा उल्लेख वानगीदाखल करता येईल.
केळकर संग्रहालयात उमटले सी. रामचंद्र यांचे सूर...!
By श्रीकिशन काळे | Updated: February 16, 2025 17:58 IST