पालिकेच्या 2 जागांसाठी जानेवारीत पोटनिवडणूक
By Admin | Updated: October 26, 2014 00:07 IST2014-10-26T00:07:10+5:302014-10-26T00:07:10+5:30
महापालिकेतील दोन नगरसेवकांनी पक्षांतर करून विधानसभा निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.

पालिकेच्या 2 जागांसाठी जानेवारीत पोटनिवडणूक
पुणो : महापालिकेतील दोन नगरसेवकांनी पक्षांतर करून विधानसभा निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. या दोन जागांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पोटनिवडणूक होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी ही पोटनिवडणूक निर्णायक ठरणार आहे.
हडपसर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मनसेची उमेदवारी घेतली, तर कसबा मतदारसंघातून राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. परंतु, पक्षांतर केल्यामुळे नगरसेवकपद संपुष्टात आले आहे. त्यामुळे केळेवाडी प्रभाग क्रमांक 26 (ब) आणि हडपसर प्रभाग क्रमांक 45 (अ) या दोन जागांसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. साधारणत: डिसेंबर महिन्यात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन जानेवारी महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिका:यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेतेपदासाठी निर्णायक ?
1 महापालिका निवडणुकीत मनसेला 29 आणि काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. मात्र, खोटय़ा प्रमाणपत्रमुळे मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे व कल्पना बहिरट यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. पोटनिवडणूक झाल्यानंतर बहिरट यांच्या जागेवर काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके निवडून आल्या, तर प्रिया गदादे यांना पुन्हा संधी मिळाली.
2 मनसेची एक जागा कमी झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले होते. परंतु, मानकर यांच्यामुळे काँग्रेसची एक जागा कमी होऊन, भानगिरे यांच्यामुळे मनसेची एक जागा पोटनिवडणुकीत वाढणार का, याची उत्सुकता आहे.