व्यापारी व कामगार आले आमनेसामने
By Admin | Updated: June 17, 2014 02:19 IST2014-06-17T02:19:25+5:302014-06-17T02:19:25+5:30
स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यावरून आता व्यापारी व कामगारांमध्ये जुंपली आहे

व्यापारी व कामगार आले आमनेसामने
पुणे : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यावरून आता व्यापारी व कामगारांमध्ये जुंपली आहे. कामगार फेडरेशनच्या व्यापाऱ्यांच्या विरोधातील भूमिकेला दि पूना मर्चंट्स चेंबरनेही प्रत्युत्तर दिले आहे. ‘कामगार फेडरेशनला जकात कशाकरिता पाहिजे, हे समाजाला माहीत आहे. जकातीमुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला होता, असे चेंबरने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे.
राज्य महापालिका, नगरपालिका कामगार फेडरेशनने राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘एलबीटी’ रद्द करण्यास विरोध दर्शविला आहे. याविषयी चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी भूमिका मांडण्यासाठी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. एलबीटीमार्फत व्यापारी रक्कम भरत आहेत. मागील आर्थिक वर्षामध्ये ‘एलबीटी’ची वसुली अपेक्षेपेक्षा जास्त झाली.
व्यापारी शहराच्या विकासास हातभार लावत आहे. या करातील अडचणी दूर करून करपद्धतीमध्ये सुटसुटीतपणा असावा ही व्यापाऱ्यांची मागणी आहे, अशी मागणी करणे हे गैर नाही. व्यापारी महसूल कर भरण्यास नकार देत नाहीत, परंतु ही पद्धत सुटसुटीत असावी आणि त्याचा त्रास होऊ नये, एवढीच व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे, असे निवदेनात नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)