अपघातातील जखमींना आणण्याचा ‘धंदा’च
By Admin | Updated: December 5, 2014 05:11 IST2014-12-05T05:11:33+5:302014-12-05T05:11:33+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील रूग्णालयांची तर ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशीच अवस्था झाली आहे.

अपघातातील जखमींना आणण्याचा ‘धंदा’च
मंगेश पांडे, पिंपरी
रुग्णावर उपचार करून त्यांना जीवदान देणारे ठिकाण या दृष्टीने रूग्णालयाकडे पाहिले जाते. मात्र, वैद्यकीय उपचार खर्चाच्या नावाखाली रूग्णालय व्यवस्थापनाकडून होत असलेल्या आर्थिक लुटीमुळे रूग्णालये बदनामी होऊ लागली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील रूग्णालयांची तर ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशीच अवस्था झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका रूग्णालयांशिवाय सुमारे चारशे रूग्णालये, क्लिनिक आहेत. पाचशे पेक्षा जास्त बेडची सुविधा असलेली दोन मोठी खासगी रूग्णालये आहेत. तर शंभर ते दोनशे बेडची सुविधा असलेली पाच खासगी रूग्णालये आहेत. या रूग्णालयांच्या स्वत:च्याच रूग्णवाहिकादेखील आहेत. शहरातील विविध भागांसह पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गांवर या रूग्णवाहिका उभ्या असतात. अपघातातील जखमींना रूग्णालयात पोहचविण्यासाठी या रूग्णवाहिकांची मदत होते. मात्र, भरमसाठ उपचार खर्चामुळे शहरातील रूग्णालये बदनाम होत आहेत.
रूग्णालयातील सुविधांबाबत वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्धी केली जाते. प्रत्येक विभागात कशा पद्धतीने उत्तम सेवा उपलब्ध आहे याबाबतचे फलक शहरात ठिकठिकाणी पहायला मिळतात. आपलेच रूग्णालय कसे दर्जेदार आहे हे दाखविण्याची जणू स्पर्धाच असते. आपल्या रूग्णालयात नामवंत डॉक्टरांकडून सेवा दिली जाते. हे माहित व्हावे यासाठी रूग्णालयात प्रवेश करताच डॉक्टरांची मोठी यादी पहायला मिळते. रूग्णाला रूग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्याचे बील सुरू होते. वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितले जाते.