महिलेवर चालत्या बसमध्ये वार
By Admin | Updated: January 10, 2015 00:40 IST2015-01-10T00:40:41+5:302015-01-10T00:40:41+5:30
स्वारगेट ते अप्पर इंदिरानगर असा प्रवास करीत असताना एका महिलेवर चालत्या बसमध्ये तरुणांनी ब्लेडने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

महिलेवर चालत्या बसमध्ये वार
पुणे : स्वारगेट ते अप्पर इंदिरानगर असा प्रवास करीत असताना एका महिलेवर चालत्या बसमध्ये तरुणांनी ब्लेडने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याची माहिती असूनही पीएमपीच्या वाहक आणि चालकाने रुग्णालयात दाखल करणे तसेच पोलिसांना माहिती कळवण्याऐवजी या महिलेला शेवटच्या थांब्यावर उतरवून दिले.
ब्लेडच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तोळण दिलीप पवार (वय ३५, रा. इंदिरानगर) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास स्वारगेटहून अप्परला जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये बसल्या, त्या वेळी दोन तरुणही त्याच बसमधून प्रवास करीत होते. जागा नसल्यामुळे पवार उभ्या होत्या. मद्यधुंद अवस्थेतील हे दोन तरुण महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन करीत होते. यातील एका महिलेने एका तरुणाला थोबाडीत मारली. चिडलेल्या दोघांनी विनाकारण पवार यांच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर ब्लेडने वार केले. गंभीर जखमी झालेल्या पवार यांच्या अंगामधून रक्तस्राव सुरू झाला होता.
बस चालक आणि वाहकाने ही बस पोलीस ठाण्यात किंवा रुग्णालयात नेणे अपेक्षित असताना या दोघांनीही हलगर्जीपणा दाखवून पवार यांना अप्परच्या शेवटच्या बसथांब्यावर उतरवले. आरोपींनाही पकडून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले नाही. जखमी अवस्थेतील पवार कशा तरी घरी पोहोचल्या. (प्रतिनिधी)
४दुसऱ्या दिवशी आपल्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या पर्वती दर्शन चौकीमध्ये गेलेल्या पवार यांना पोलिसांच्या उदासीनतेचा अनुभव आला. पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्याऐवजी ससून रुग्णालयातून जखमी असल्याचे प्रमाणपत्र घेऊन येण्यास फर्मावले. जखमी अवस्थेतील पवार तशाच ससूनला जाऊन प्रमाणपत्र घेऊन आल्या. त्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.