नोकरदारांच्या खिशाला महागाईचा भार

By Admin | Updated: March 2, 2015 03:26 IST2015-03-02T03:26:42+5:302015-03-02T03:26:42+5:30

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सेवा व अबकारी करात केलेली वाढ तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा भार पडणार आहे.

The burden of the inflation of employees | नोकरदारांच्या खिशाला महागाईचा भार

नोकरदारांच्या खिशाला महागाईचा भार

पुणे : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सेवा व अबकारी करात केलेली वाढ तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा भार पडणार आहे. एप्रिल महिन्यापासून सर्वच सेवा तसेच बहुतेक वस्तूंचे दर महागणार आहेत. असे असले तरी पेट्रोल-डिझेल वाढल्याने याची सुरुवात काही दिवसांतच होईल. परिणामी सामान्यांना घर चालवताना काटकसर करावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ‘अच्छे दिन’ची स्वप्नं पाहणाऱ्या सामान्य नागरिकांना ‘बुरे दिन’ची चाहूल लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत अनेक लोकप्रिय घोषणा करून सामान्य नागरिकांच्या अपेक्षा वाढविल्या होत्या. त्यामुळे अर्थसंकल्पातून त्या घोषणा पूर्ण होतील, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र सामान्यांना थेट फायदा मिळेल अशी कोणतीही अर्थपूर्ण घोषणा झाली नाही. उलट सेवा व अबकारी करात वाढ करून महागाईला खतपाणीच घातले आहे. नोकरदार वर्गाची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविली जाईल ही अपेक्षाही फोल ठरली आहे. त्यामुळे उत्पन्नावरील प्राप्तिकर नेहमीप्रमाणेच भरावा लागणार आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही तासांतच पेट्रोल व डिझेलच्या किमतीत एकदम तीन रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर आणखी बोजा पडला. सेवा व अबकारी कराचा परिणाम एप्रिल महिन्यापासून जाणवणार असला तरी त्याची चिंता आतापासून लागून राहिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने काही प्रमाणात महागाईला आतापासून खतपाणी मिळणार आहे, असा निराशेचा सूर सामान्य नागरिकांतून उमटत आहे.

 

Web Title: The burden of the inflation of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.