पुरंदरमधील बंडोबा अखेर झाले थंड
By Admin | Updated: February 14, 2017 01:46 IST2017-02-14T01:46:43+5:302017-02-14T01:46:43+5:30
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या २७ जणांनी, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी

पुरंदरमधील बंडोबा अखेर झाले थंड
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या २७ जणांनी, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या ६३ जणांनी आज अर्ज माघारी घेतले आहेत. तरीही, कोळविहीरे- नीरा गटातून राष्ट्रवादीच्या सुजाता दगडे आणि कोळविहीरे गणातून राष्ट्रवादीचेच सुरेश जगताप यांनी बंडखोरी केलीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पुरंदरच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजपा-मनसे अशी चौरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेसाठी ४५ आणि पंचायत समितीसाठी १०१ एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
आज यातील प्रत्येकी २७ आणि ६३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने जिल्हा परिषदेसाठी १८ आणि पंचायत समितीसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती.
काहींनी भाजपाची ही उमेदवारी घेतली आहे. तर, काहींनी अजूनही उमेदवारी ठेवून पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली आहे. असे असले, तरीही काल अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यात बेलसर -माळशिरस आणि कोळविहीरे-नीरा गटात सभा घेऊन बंडखोरांना सज्जड दम दिला होता, तसेच समजावण्याचाही प्रयत्न केला होता. वाघापूर येथील सभेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते यांचे नाव न घेता शरद पवारांमुळे अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे अस्तित्व आहे तसेच तुमचे आहे. साहेबांनी एवढे देऊनसुद्धा पक्षांविरुद्ध बंड करता आहात. हीच का तुमची निष्ठा? अशा भाषेत सुनावले होते.
आज अर्जमाघारीच्या दिवशी विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला असला, तरीही पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार की नाही, हे समजू शकले नाही. तर, याच गटाच्या माळशिरस गणासाठी राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष महादेव शेंडकर यांनी बंडखोरी करून पत्नी मीना यांचा भाजपाकडून अर्ज भरला होता. अजित पवारांच्या सूचनेवरून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे भाजपाची गोची झाली आहे. या गणातील पक्षाच्या एका अधिकृत उमेदवारानेच माघार घेतली आहे. नीरा-कोळविहीरे गट वगळता सर्वच ठिकाणचे बंडखोर थंड झाल्याचेच आज निदर्शनास आले.
कोळविहीरे-नीरा गटात सर्वाधिक जास्त उमेदवारी अर्ज होते. आज अनेकांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले; मात्र ६ महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देऊन पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता दगडे आणि त्यांचे पती डॉ. वसंत दगडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी देण्याचा आपल्याला शब्द दिला होता; परंतु डावलले गेल्याने सुजाता दगडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याबरोबर कोळविहीरे गणातही गुळुंचे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश जगताप यांनीही शब्द देऊनही डावलल्याचा आरोप करून आपली बंडखोरी कायम ठेवली आहे.
कोळविीहीरे येथील सभेत अजित पवार यांनी त्यांचे नाव घेऊन बंडखोरी करू नये, असे सांगितले होते. तरीही त्यांनी उमेदवारी ठेवली आहे. वीर गणात ही राष्ट्रवादीच्या स्वाती राजेंद्र यादव यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळविली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षनेत्यांचा मान ठेवून ज्यांनी आज आपले उमेदवारी अर्ज
माघारी घेतले त्यांचे आभार मानले आहेत. तर सुजाता दगडे, त्यांचे पती डॉ. वसंत दगडे, सुरेश जगताप आणि स्वाती यादव यांची आज पक्षातून हकालपट्टी केली आहे. तशी माहिती तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण यांनी दिली. (वार्ताहर)