नगरसेवकांत काट्याची टक्कर
By Admin | Updated: February 14, 2017 02:21 IST2017-02-14T02:21:36+5:302017-02-14T02:21:36+5:30
पंख्याच्या आकारासारखा आणि सर्वांत मोठा प्रभाग असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभाग क्र.७ मध्ये

नगरसेवकांत काट्याची टक्कर
पुणे : पंख्याच्या आकारासारखा आणि सर्वांत मोठा प्रभाग असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभाग क्र.७ मध्ये काँग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या पण, उच्च न्यायालयाने अपक्ष ठरविलेल्या नगरसेविका रेश्मा भोसले
तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश निकम यांच्यातील लढतीने सर्व पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे़
हा प्रभाग शहरातील सर्वांत मोठा समजला जातो़ तीन तुकडे एकत्र करून बनविलेल्या या प्रभागाच्या एका भागाचा दुसऱ्या भागाशी फारसा संबंध येत नाही़ ८४ हजार मतदारसंख्या असलेल्या या प्रभागातील चार जागांसाठी वेगवेगळ्या भागातील उमेदवार निवडताना सर्वच पक्षांचा कस लागला़ मागील दोन-तीन महिन्यांत नव्याने समावेश केलेल्या भागातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी काशी यात्रांपासून मुलांना अम्युझमेंट पार्कची सफर घडविण्यात इच्छुक दंग होते़ प्रत्येक उमेदवाराने नव्या भागात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला़ काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता बहिरट यांना मानणारा मतदार या भागात आहे़
याशिवाय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अॅड़ नीलेश निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे़ या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वीपासून प्राबल्य होते़ त्याचा लाभ त्यांना मिळेल का, हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे़
विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने नाट्यमयरीत्या त्यांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश, यानंतर राज्य निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप, आणि त्याला उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय यामुळे या प्रभागाची राज्यभर चर्चा झाली़ रेश्मा भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले़ त्याचा निर्णय सोमवारी लागून त्यांची अपक्ष उमेदवारी कायम केली आहे़ भाजपाने त्यांना पुरस्कृत केले आहे. भाजपाचे कमिटेड मतदार कमळ चिन्ह नसताना त्यांना मतदान करणार का, हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे़ याशिवाय शिवसेनेचे हरीश निकम आणि मनसेचे श्याम माने हे कशी लढत देतात, यावर पारडे कोणाकडे झुकणार, हे निश्चित होण्याची शक्यता आहे़
प्रभाग ७मधील ‘अ’ गटातून राष्ट्रवादी काँगे्रसच्या आशा साने, भाजपाच्या सोनाली लांडगे, शिवसेनेच्या वनमाला कांबळे आणि काँग्रेसच्या रूपाली मोरे यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे़
प्रभाग ७ ‘ब’मध्ये भाजपाच्या राजश्री काळे, काँग्रेसच्या नंदा रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनश्री चव्हाण, शिवसेनेच्या सुरेखा भवारी यांच्यात लढत होत आहे़
७ ‘क’मध्ये ९ उमेदवार असले तरी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व शिवसेनेचे उमेदवार विनोद ओरसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका शारदा ओरसे यांचे पुत्र रवींद्र ओरसे तसेच काँग्रेसच्या छाया शिंदे, भाजपाचे आदित्य माळवे आणि मनसेचे शंकर पवार यांच्यात लढत रंगणार आहे़
(प्रतिनिधी)