बैलपोळ्याला लागली ओहोटी
By Admin | Updated: October 12, 2015 01:06 IST2015-10-12T01:06:07+5:302015-10-12T01:06:07+5:30
झुंजूमुंजू पहाट... कोंबड्याने दिलेली बांग... जात्यावरच्या ओव्या... आणि थंडगार हवा चाखत... गवतावरचे दवबिंदू पायावर झेलत...गळ्यातील किणकिणणाऱ्या घंटीच्या स्वरात

बैलपोळ्याला लागली ओहोटी
विलास भेगडे, तळेगाव दाभाडे
झुंजूमुंजू पहाट... कोंबड्याने दिलेली बांग... जात्यावरच्या ओव्या... आणि थंडगार हवा चाखत... गवतावरचे दवबिंदू पायावर झेलत...गळ्यातील किणकिणणाऱ्या घंटीच्या स्वरात मानेला हेलकावे देत रानाच्या दिशेने निघालेली गुरंढोरं अन् त्यांच्यामागे फडक्यात मिरची-भाकरी नाही, तर झुणका-भाकरी व कांदा बांधून हातातील काठी फिरवत चाललेला बळीराजा हे चित्रही आता ग्रामीण भागात दिवसेंदिवस रोडावत चाललेले आहे.
आधुनिकीकरणाने कंपन्याच्या भोंग्यामागे धावणाऱ्या कामगारांची संख्या वाढत आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या बैलपोळ्याच्या सणास मावळातील वाढत्या शहरीकरणामुळे ओहोटी लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही बैलपोळा हा केवळ मातीच्या अथवा प्लॅस्टरच्या बैलांच्या प्रतिमांवरच साजरा करावा लागेल, अशी खंत शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत.
बैलांची संख्या रोडावल्याने उत्साहात साजरा होणारा हा सण साधेपणाने साजरा होऊ लागला. अलीकडच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेतीतील कामात नवनवीन यंत्राचा वापर सुरू झाला आहे. बैलाची कामे यंत्रे करू लागली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीतील कामे झटपट होऊ लागली आहेत.
गावोगावी बैलपोळ्याचा सण साजरा होत होता; पण आता त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे गोठा असायचा. त्यात अनेक जनावरे असायची; पण आता कितीतरी शेतकरी केवळ मातीचे बैल आणून बैलपोळा साजरा करतात.