टक्केवारीमुळे बिल्डर मेटाकुटीस
By Admin | Updated: October 12, 2015 01:38 IST2015-10-12T01:38:59+5:302015-10-12T01:38:59+5:30
बांधकामांसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी ‘टक्केवारी’च्या रुपाने होणारा भष्ट्राचार हाच महापालिकेत शिष्टाचार बनल्याने बांधकाम व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत़

टक्केवारीमुळे बिल्डर मेटाकुटीस
पुणे : बांधकामांसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी ‘टक्केवारी’च्या रुपाने होणारा भष्ट्राचार हाच महापालिकेत शिष्टाचार बनल्याने बांधकाम व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत़ प्रती चौरस फुटाच्या हिशेबाने घेतल्या जाणाऱ्या या टक्केवारीमुळे बांधकामाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) हे अडवणुकीचे हत्यार बनले आहे़
महापालिकेच्या बांधकाम विभागामध्ये बोकाळलेल्या लाचखोरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने बांधकाम व्यावसायिक चांगलेच हवालदिल झाले आहेत. सध्या मंदीचे वातावरण असल्याने सदनिकांच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला असताना पालिकेत द्यायच्या टक्केवारीत मात्र वाढच होत आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांना ठाणे पालिकेकडून बांधकाम परवाने मिळविण्यासाठी अधिकारी व नगरसेवकांनी मोठा त्रास दिल्याने परमार यांनी सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याचा निषेध करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेकडून पुणे महापालिकेवर मंगळवार, १३ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला जाणार आहे. तसेच यादिवशी संपूर्ण शहरात बंद पाळला जाणार आहे.
बांधकाम व्यावसायिकांना अनेक खात्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकामाला विलंब होतो. लवकर परवानगीसाठी अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. फाइल सबमिट करण्यापासून याची सुरुवात होते. त्यानंतर प्लॅन तपासणी, सिटी सर्व्हेकडून सीमा रेषांची आखणी, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रेनहार्वेस्टिंग, अग्निशमन, लिफ्ट, उद्यान विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागते. डीसी रूलमधील किचकट नियम दाखवून परवानगी रखडवून ठेवली जाते.