बिल्डर उतरले रस्त्यावर

By Admin | Updated: October 14, 2015 03:23 IST2015-10-14T03:23:37+5:302015-10-14T03:23:37+5:30

बांधकाम मंजुरी प्रक्रियेतील भेदाभेद नष्ट करा. मंजुरी, वहिवाट प्रमाणपत्रे, चौथरा तपासणी प्रमाणपत्रे आदी अनावश्यकपणे स्थगित करणे संपवा

The builder came down on the street | बिल्डर उतरले रस्त्यावर

बिल्डर उतरले रस्त्यावर

पुणे : बांधकाम मंजुरी प्रक्रियेतील भेदाभेद नष्ट करा. मंजुरी, वहिवाट प्रमाणपत्रे, चौथरा तपासणी प्रमाणपत्रे आदी अनावश्यकपणे स्थगित करणे संपवा, मनानुसार निर्णय घेऊन मंजुरीला विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरा, फायलीला विलंब किंवा निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लावला, तर त्याला उत्तरदायी धरून अशा चुकार अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यावसाईकांच्या संघटनेने काढलेल्या प्रचंड मोर्चात करण्यात आली.
सरकारचे उदासिन धोरण व भ्रष्टाचारी प्रशासकीय यंत्रणा यामुळे ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांने केलेल्या आत्महत्येच्या तीव्र प्रतिक्रिया मंगळवारी शहरात के्रडाईच्या पुणे मेट्रोने आयोजित मोर्चात उमटल्या. लाल फितीचा कारभार, विविध परवानग्यांना लागणारा विलंब, अधिकाऱ्यांकडून होणारे ब्लॅकमेलिंग या विरोधात आवाज उठविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये राज्यातील सुमारे १८ हजार पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक व त्यांचे कर्मचारी सहभागी झाले होतो. मराठी बांधकाम व्यावसायीक असोसिएशन(एमबीव्हीए), आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल इंजिनियर्स असोसिएशन्स सहभागी झाली होती.
पूना क्लब ग्राउंडपासून मोर्चास सुरूवात झाली. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, सुहास मर्चंट, रोहित गेरा, अनिल फरांदे, किशोर पाटे, मनीष जैन, मानद चिटणीस अनुज भंडारी, मानद संयुक्त चिटणीस अनुज गोयल, खजिनदार नितीन न्याती यांच्यासह ज्येष्ठ बांधकाम व्यावसाईक डी. एस. कुलकर्णी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
क्रेडाईच्या शिष्टमंडळाच्या वतीने विभागीय आयुक्तासह, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन निवेदने देण्यात आले. रिअल इस्टेट उद्योगाला भेडसावणा-या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची विनंती या निवेदनात केली आहे. बांधकाम व्यवसायाशी संबंधित सर्व मंजुरी प्रक्रियेतील भेदाभेद नष्ट करण्यासह विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: The builder came down on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.