आयुक्तांचे अंदाजपत्रक १,२०० कोटींनी फुगविलेले

By Admin | Updated: February 2, 2016 01:37 IST2016-02-02T01:37:58+5:302016-02-02T01:37:58+5:30

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदा ५ हजार कोटींचा आकडा ओलांडणारे विक्रमी अंदाजपत्रक सादर केले आहे. एकाही नवीन प्रकल्पाची घोषणा अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली

Budget estimates of 1,200 cr | आयुक्तांचे अंदाजपत्रक १,२०० कोटींनी फुगविलेले

आयुक्तांचे अंदाजपत्रक १,२०० कोटींनी फुगविलेले

पुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदा ५ हजार कोटींचा आकडा ओलांडणारे विक्रमी अंदाजपत्रक सादर केले आहे. एकाही नवीन प्रकल्पाची घोषणा अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली नसतानाही आयुक्तांनीच १,२०० कोटी रुपयांनी फुगविलेले अंदापत्रक सादर केले असल्याची जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
महापालिकेचे आगामी २०१६-१७चे अंदाजपत्रक कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केले आहे. स्थायी समितीकडून ते मुख्य सभेला सादर केले जाईल. या पार्श्वभूमीवर, आयुक्तांच्या अंदाजपत्रकातील त्रुटी उजेडात आणण्यात आल्या आहेत.
महापालिकेला बांधकाम शुल्कामधून २०११पासून सरासरी ६०० कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. सध्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण असताना पुढील आर्थिक वर्षामध्ये ९३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळेल, असे अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
वस्तुत: मंदीचा विचार करून बांधकाम शुल्काचे उत्पन्न कमी धरणे आवश्यक होते. मिळकत कर उत्पन्नही ६०० कोटी रुपयांच्या दरम्यान असताना पुढील
वर्षात ८५६ कोटी रुपये त्यातून मिळतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. महापालिकेला मिळणाऱ्या इतर उत्पन्नस्रोतांमधून गेल्या ५ वर्षांत २५० कोटींची वाढ झाली आहे; पण एकाच वर्षात या उत्पन्नामध्ये आणखी २५० कोटींची वाढ होईल, असा अंदाज धरण्यात आला आहे.
महापालिकेचे उत्पन्न घटत असताना महसुली खर्चामध्ये मात्र मोठी वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय आयुक्तांनी सुचविणे आवश्यक असताना त्याबाबत काहीच तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. खर्चावर नियंत्रण ठेवण्याऐवजी पाणीपट्टीमध्ये वाढ करून नागरिकांवर बोजा टाकण्यात आला आहे. इतर उत्पन्नामध्ये ज्याप्रमाणे मोठी वाढ दर्शविली, त्याचप्रमाणे इतर खर्चामध्येदेखील २९० कोटींनी वाढ होईल, हे दर्शविण्यात आले आहे.

Web Title: Budget estimates of 1,200 cr