‘बीआरटी’चा मार्ग धोकादायकच!
By Admin | Updated: September 11, 2015 04:47 IST2015-09-11T04:47:03+5:302015-09-11T04:47:03+5:30
महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जलद गती बससेवेचे (बीआरटीएस) ‘सेफ्टी आॅडिट’ न करता घाईघाईने उद्घाटन केले. त्यामुळे सांगवी-रावेत या साडेचौदा किलोमीटर

‘बीआरटी’चा मार्ग धोकादायकच!
- मिलिंद कांबळे, पिंपरी
महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जलद गती बससेवेचे (बीआरटीएस) ‘सेफ्टी आॅडिट’ न करता घाईघाईने उद्घाटन केले. त्यामुळे सांगवी-रावेत या साडेचौदा किलोमीटर अंतराच्या मार्गावर दोनच दिवसानंतर एका पादचाऱ्याचा बळी गेला. त्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधींनी बीआरटी मार्गाची ‘आॅन द स्पॉट’ पाहणी गुरुवारी केली. त्या वेळी बीआरटी सेवा अद्याप असुरक्षित आणि धोकादायक असल्याचे चित्र समोर आले. बीआरटी मार्गाभोवती पूर्णपणे सुरक्षा कठडे उभारले नाहीत. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे रस्ता शॉर्टकट म्हणून बीआरटी मार्गाचा उपयोग जीव धोक्यात घालून करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा जागावाजा करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच सप्टेंबरला बीआरटी मार्गाचे उदघाटन केले. मात्र, बीआरटी मार्ग नागरिकांसाठी सुरक्षित असल्याचे कोणतीही पाहणी व तपासणी थर्ड पार्टीकडूून करण्यात आलेले नाही. सांगवी ते किवळे मार्गावर अद्याप सर्व ठिकाणी संरक्षक कठडे बसविले गेलेले नाहीत. त्यामुळे पादचारी जीव धोक्यात घालून सर्रासपणे ये-जा करतात. दोन दिवसांपूर्वी एका पादचाऱ्याचा या मार्गावर नाहक बळी गेला.
त्यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या बीआरटीएस मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी मार्गावर अनेक ठिकाणी कठडे व बॅरेकेटमध्ये रिकामी जागा, तर काही ठिकाणी बॅरेकेट तुटलेले दिसले. या छोट्याशा फटीतूनही पादचारी बीआरटीएस मार्गात घुसत आहेत. त्यामध्ये महिला प्रवाशी व पादचा-यांची संख्या सर्वाधिक आहे. औंध येथील पुणे जिल्हा रुग्णालय, थेरगाव, जगताप डेअरी, सांगवी, पिंपळे निलख येथे बिनदिक्कतपणे पादचारी बीआरटीएस मार्गातून रस्ता ओलांडताना दिसून आले. मात्र, त्याठिकाणी कोणताही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले.
दुभाजक ओलांडण्याची कसरत...
बीआरटीएस मार्गावर काही लोखंडी बॅरकेट तुटले होते, तर काही वाकले होते. काही कठड्याचे पत्रे बाहेर आले होते. त्यामुळे जवळून जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका आहे. सुरक्षा कठडे आणि उंच दुभाजकावर उड्या मारून काही जण सहजपणे रस्ता क्रॉस करीत होते. समोरून बस आली तरी, त्यांना काहीच फरक पडत नव्हता. कठड्याला खेटून उभे राहत बसला वाट करून देण्याचा गंभीर प्रकार पहायला मिळाला. बस पुढे गेल्यानंतर सहजपणे दुभाजकावरून उडी मारून पलीकडचा रस्ता गाठण्याची कसरत केली जात आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांना सर्वाधिक धोका आहे.
बॅरिगेट्सची दुरवस्था
प्रत्येक बसथांब्यावर सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र, ते प्रवाशांना मार्गदर्शन करण्यापेक्षा पेपर वाचण्यात दंग दिसले. अनेक सुरक्षारक्षक खुर्चीत बसून आराम करताना दिसले. प्रवाशांच्या ये-जा करण्याकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसले. थांब्यावरील दरवाजे उघडे असले, तरी ते त्याबाबत काहीच करताना दिसत नव्हते.
सुरक्षा व्यवस्था खिळखिळी...
बीआरटीएस मार्गावर वाहन लावण्यास बंदी असताना त्या ठिकाणी नेमलेल्या सुरक्षारक्षक किंवा वॉर्डनने स्वत:ची दुचाकी तेथे बिनदिक्कतपणे मार्गावर लावली होती. इतर वाहनांना मात्र अटकाव केला जात होता. रस्ता क्रॉस होत असलेल्या ठिकाणी वॉर्डन थांबलेले असल्याने दुचाकी वा चारचाकी वाहने बीआरटीएसमध्ये शिरत नव्हते. बहुतेक वॉर्डन पावसात दक्ष असल्याचे चित्र होते. कोणत्याही वाहनास ते प्रवेश देत नव्हते. मात्र, अनेक सिग्नल बंद होते.