बीआरटीला माजी सैनिकांची ‘बॉर्डर’
By Admin | Updated: March 7, 2015 00:08 IST2015-03-07T00:08:36+5:302015-03-07T00:08:36+5:30
शहरातील बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) मार्गातील इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) माजी सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीआरटीला माजी सैनिकांची ‘बॉर्डर’
पुणे : शहरातील बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) मार्गातील इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) माजी सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध बीआरटी मार्गावर हे माजी सैनिक वॉर्डन म्हणून काम करताना, या मार्गावर इतर वाहनांना येण्यास मज्जाव करतील. त्यासाठी सुमारे २०० माजी सैनिक नियुक्त केले जाणार आहेत.
शहरातील सार्वजनिक बस वाहतूक अधिक वेगाने व्हावी, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रज व स्वारगेट ते हडपसर
या मार्गावर बीआरटी सेवा
सुरू करण्यात आली. त्यानंतर अन्य काही महत्त्वाच्या रस्त्यांवर
बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. मात्र, या मार्गासाठी आवश्यक नियोजन न केल्याने या मार्गाचा बोजवारा उडाला. हे मार्ग चौकाचौकात तोडण्यात आल्याने इतर वाहनांची घुसघोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
त्यामुळे जीवघेणे अपघातही झाले आहेत. ‘इंटिलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) न उभारता बसवाहतूक सुरू असल्याने बीआरटी सेवा कोलमडली आहे. आता पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांनी ‘आयटीएमएस’साठी पीएमपीला पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी म्हणाले, की आयटीएमएसचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार बीआरटी मार्ग परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
अनेक ठिकाणी हा मार्ग अर्धवट
आहे. त्यामुळे दुचाकींसह चारचाकी वाहने या मार्गात घुसतात. त्यामुळे बसला अडथळा निर्माण होतो.
याचा विचार करून या मार्गावर अशा ठिकाणी माजी सैनिक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे माजी सैनिक वॉर्डन
म्हणून काम करतील. केवळ इतर वाहनांना बीआरटी मार्गात प्रवेश करू न देण्याची त्यांची जबाबदारी असेल. असे सुमारे २२० वॉर्डन नियुक्त केले जातील.
दोन्ही पालिका त्यांच्या वेतनाची जबाबदारी उचलतील. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, लवकरच ही नियुक्ती केली जाईल, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)
ताफ्यातील किमान ८० टक्के बस मार्गावर आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे मार्गावरील बसेसची संख्या १६०० च्या घरात गेली आहे. मात्र बस वाढूनही चालक व वाहकांची कमतरता जाणवू लागल्याने त्यांच्याअभावी बस आगारातच उभ्या कराव्या लागतात.
ही स्थिती सुधारण्यासाठी केवळ गर्दीच्या वेळी अधिक बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली. साधारणत: सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत शहरात बससाठी अधिक गर्दी असते.
याच वेळेत संबंधित मार्गांवर १५५० बस सोडल्या जातील तर इतर वेळेत मार्गावर सुमारे ११०० बस असतील. त्यामुळे चालक व वाहकांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणे शक्य होईल. जेणेकरून चालक व वाहकांची कमतरता जाणवणार नाही, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.